Sat, Feb 23, 2019 12:28होमपेज › Pune › इंधन दरवाढीविरोधात सेनेचा सायकल मोर्चा

इंधन दरवाढीविरोधात सेनेचा सायकल मोर्चा

Published On: May 31 2018 1:45AM | Last Updated: May 30 2018 11:27PMपिंपरी : प्रतिनिधी

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेने  बुधवारी सायकल मोर्चा काढला. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवला.  भाजप सरकारने इंधन दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

पेट्रोल 86 रुपये लिटर झाले आहे. वर्षभरात पेट्रोलच्या दरात दहा रुपयांची वाढ झाली असून, सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले आहे. इंधन दरवाढीसोबत वाहतुकीच्या खर्चातही वाढ झाल्याने बाजारपेठेत महागाईने कळस गाठला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने बुधवारी मोरवाडी चौकातून सकाळी दहा वाजता मोर्चा काढला.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोर्चाचा समारोप करण्यात आला. 
 शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, महिला आघाडी शहरसंघटक सुलभा उबाळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. 

खासदार बारणे म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढलेले नसताना आपल्या देशात इंधनाचे दर का वाढले आहेत. वास्तविक 35 रुपये लिटरने मिळू शकणारे पेट्रोल 85 रुपये लिटरने विकत घ्यावे लागत आहे. सरकारने इंधनावर तब्बल 66 टक्के कर लावला आहे. त्यामुळे दुप्पट किमतीने इंधन खरेदी करावे लागत आहे. 

आमदार चाबुकस्वार म्हणाले, सलग 15 दिवस पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत. महाराष्ट्राला लागून असलेल्या गुजरातमध्ये 8 ते 10 रुपयांनी स्वस्त इंधन मिळत आहे. त्यामुळे सरकारने इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणून दरवाढ तत्काळ कमी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

या मोर्चात  नगरसेविका अश्विनी चिंचवडे, रेखा दर्शिले, मधुकर बाबर, राम पात्रे, अशोक जाधव, राम उत्तेकर, सय्यद पटेल, आबा लांडगे, रोमी संधू, निलेश हाके, अनंत कोहाळे,   वैशाली मराठे, अनिता तुतारे, आशा भालेकर, शशिकला उभे, शारदा वाघमोडे, भारती चकवे आदी सहभागी झाले होते.