Wed, May 22, 2019 16:34होमपेज › Pune › म्हणून  ‘स्थायी’ अध्यक्षपद निवडणुकीत सेना तटस्थ 

म्हणून  ‘स्थायी’ अध्यक्षपद निवडणुकीत सेना तटस्थ 

Published On: Mar 12 2018 12:53AM | Last Updated: Mar 12 2018 12:52AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादी व शिवसेनेत रिंग झाली असल्याचा भाजपकडून होत असलेला आरोप अन् आपले समर्थक राहुल जाधव यांना डावलले जाऊनही आमदार महेश लांडगे यांनी घेतलेली शांत राहण्याची व संयमाची भूमिका यामुळेच शिवसेनेने स्थायी समिती अध्यक्षपद निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याची चर्चा आहे .

पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती निवडणुकीत स्पर्धेतील नावांना कात्री लावत भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी ऐनवेळी  ममता गायकवाड यांचे नाव पुढे आणले, त्यामुळे महापौर नितीन काळजे, स्थायी समिती सदस्य राहुल जाधव, शीतल शिंदें यांनी राजीनामे दिले. भाजपात रणकंदन माजल्याचे दिसल्याने राष्ट्रवादीने याचा फायदा उठविण्यासाठी मोरेश्वर भोंडवे यांना रिंगणात उतरवले.  पण भाजपातील हे वाद पेल्यातील वादळ ठरले. स्थायीच्या अध्यक्षपदी ममता गायकवाड यांची अपेक्षेप्रमाणे निवड झाली. भोंडवे यांचा अर्ज भरताना समवेत असलेली शिवसेना या निवडणुकीत तटस्थ राहिल्याने त्याची शहरात चर्चा आहे.

महापालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादी व शिवसेनेत रिंग झाली असल्याचा भाजपकडून होत असलेला आरोप अन् आपले समर्थक राहुल जाधव यांना डावलले जाऊनही आमदार महेश लांडगे यांनी घेतलेली संयमाची भूमिका यामुळेच शिवसेनेने स्थायी समिती अध्यक्षपद निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याचे समजते.

पालिकेत  समाविष्ट गावांतील 425 कोटीच्या कामात भ्रष्टचार झाल्याचा आरोप करत  राष्ट्रवादी व शिवसेनेने भाजपला घेरले तेव्हा स्थायी समिती  अध्यक्षा सीमा सावळे यांनी त्यास आक्रमक उत्तर दिले.   सेनेत कालपरवा आलेल्यांना चिमटेही घेतले. 

नव्याने समाविष्ट गावांतील 425 कोटींच्या खर्चाला मंजुरी देताना कामांमध्ये रिंग झाली म्हणून बोंब ठोकण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रिंग झाली असल्याचा आरोप  त्यांनी केला. एकीकडे अजित पवार हे शिवसेनेच्या वाघाची शेळी, शेळीचा ससा अन् सशाच  कासव झाल्याची टीका करतात.   शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे वाघ, ससा काही असो पण आम्ही धरणात लघुशंका करत नाही, असे उत्तर देतात.  अन् पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र शिवसेना राष्ट्रवादीसोबत गुफ्तगू करत आहे. शिवसेना इतकी लाचार कधीच नव्हती, आम्ही सेनेत असताना सभागृहात संख्येने खूप कमी होतो पण राष्ट्रवादीचा घाम काढला होता. आता सेना आणि राष्ट्रवादीत राजकीय रिंग झाली असल्याची टीका त्यांनी केली होती. 

शिवसेना गटनेते यांच्या कार्यालयात राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांचा वाढलेला वावरही भाजपने लोकांसमोर आणला. शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर व शहर संघटिका सुलभा उबाळे या दोघांनीही याबाबत  नाराजी व्यक्त केल्याची चर्चा होती, त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपद निवडणुकीत राष्ट्रवादीची पाठराखण केल्यास शिवसेनेला भाजप पुन्हा लक्ष्य करेल ,अन् एवढे करूनही भोंडवे निवडून येत नसतील तर आपण आपली ताकद कशाला पणाला लावायची असा विचार करून शिवसेनेने या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे