Tue, Apr 23, 2019 21:52होमपेज › Pune › ठाकरेंच्या विश्वासाने भोसरी विधानसभेत शिवसैनिकांत नवचैतन्य

ठाकरेंच्या विश्वासाने भोसरी विधानसभेत शिवसैनिकांत नवचैतन्य

Published On: Jul 17 2018 1:36AM | Last Updated: Jul 17 2018 1:25AMपिंपरी : संजय शिंदे

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खा. शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या कामाचे केलेले कौतुक, खा. आढळराव हेच  राहणार लोकसभा निवडणुकीत   पक्षाचे उमेदवार आणि शिरुर मतदारसंघातील किमान चार विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले पाहिजेत असा दिलेला आदेश यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. 

2019 च्या फेब्रुवारी ते मार्च दरम्यान लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा किंवा दोन्ही निवडणुका एकत्र होतील असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पुणे येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. पैकी शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खा. आढळराव-पाटील यांचे काम उत्तम असून येणार्‍या लोकसभा निवडणुकीत ते शिरुरचे अधिकृत उमेदवार राहणार असल्याचा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ते शिवसेनेव्यतिरिक्त इतर पक्षाच्यावतीने निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेला पुर्णविराम दिल्याने भोसरीतील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

लोकसभा निवडणुकीत खा. आढळरावांना विविध विधानसभा मतदारसंघात भरघोस पाठिंबा मिळतो; मात्र विधानसभा निवडणुकींमध्ये त्या प्रमाणात मतदान होत नाही. याच्या खोलाशी जाऊन त्याबाबत विचार होणे आवश्यक आहे. काही झाले तरी किमान चार विधानसभा मतदारसंघात भगवा फडकविला पाहिजे. आढळरावांचे काम उत्तम असल्यामुळे त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत ही होऊ शकतो त्यामुळे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागा असा आदेश ठाकरे यांनी दिल्याचे समजते.

सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून चाकणचे विमानतळ खा. आढळराव यांच्या विरोधामुळे पुरंदरला गेल्याचा आरोप होत होता; मात्र याबाबत केंद्रीय राज्यमंत्री मदन येरावार यांनी भीमा नदीच्या पात्रात करावा लागणारा बद्दल, टेकड्यांचे सपाटीकरण, डोंगर रांगा इत्यादी तांत्रिक आडचणींमुळे  तसेच मोठ्या प्रमाणावर बाधित होणारे बागायती, वनक्षेत्र तसेच प्रकल्पग्रस्त आदी कारणामुळे सदर ठिकाणी विमानतळ उभारणे सुयोग्य होणार नाही असे भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाच्या पाहणीत निदर्शनास असल्याचे निर्वाळा दिल्याने खा. आढळरावांना घेरण्याचा विरोधकांचा डाव  हाणून पडल्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघात आढळरावांच्या लोकसभा मतदारसंघाबरोबरच भगवा फडकविण्यासाठी विश्वास निर्माण झाल्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.