Tue, Apr 23, 2019 09:54होमपेज › Pune › विधानसभेला सेनेच्याही ‘आयातांना’ पायघड्या

विधानसभेला सेनेच्याही ‘आयातांना’ पायघड्या

Published On: Feb 10 2018 1:53AM | Last Updated: Feb 10 2018 1:28AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

भाजपपाठोपाठ शिवसेनेनेही आयातांसाठी पायघड्या अंथरल्याचे संकेत मिळत आहेत. येत्या विधानसभेला ताकदीची माणसे आपल्याकडे ओढण्याचा सेनेचा प्रयत्न सुरू आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीसह विविध पक्षांतील ताकदीची माणसे आपल्याकडे ओढून सत्ता मिळवली. महापालिका निवणुकीतही हेच चित्र दिसले. खरे तर विधानसभेला राष्ट्रवादीसह विविध पक्षांतील दिग्गज शिवसेनेच्या संपर्कात होते, त्यात भोसरीचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांचाही समावेश होता; मात्र पक्षाच्या निष्ठावंत सुलभा उबाळे यांनी स्वतःसाठी आग्रह धरल्याने, शिवसेना पक्षश्रेष्ठींनी लांडगे यांच्यासाठी नकारघंटा वाजवली. या निवडणुकीत लांडगे हे सर्वपक्षीय नाराजांच्या पाठिंब्यावर विजयी झाले. त्याचा परिणाम सेनेला पालिका निवडणुकीत भोगावा लागला.  आ. लांडगे यांनी भोसरी व ग्रामीण पट्ट्यात भाजपला मोठे यश मिळवून दिले. दुसरीकडे लोकसभेला मावळातून सेनेतर्फे चाचपणी केलेल्या आ.  लक्ष्मण जगताप यांनी पालिका निवडणुकीत चिंचवड पट्ट्यात भाजपला मोठे यश मिळवून दिले. हे सर्व चित्र पाहून सेना नेते अस्वस्थ झाले आहेत. यापुढे डोकी वाढवण्यासाठी इतर पक्षांतील ताकदीची माणसे आपल्याकडे ओढण्याचे सेनेचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे  यापुढे निष्ठवंतांचे कितपत ऐकले जाईल, याबाबत शंकाच आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत सेनेच्या पिंपरी-चिंचवडच्या  पदाधिकार्‍यांची नुकतीच बैठक झाली. या वेळी त्यांनी दरवाजे, खिडक्या खुल्या ठेवा, असे आवाहन केले होते. ‘शिवसेना पक्ष हा कोणाच्या मालकीचा नाही. शिवसेनाप्रमुख स्वत: म्हणायचे मी मालक नाही, मी पक्षाचा विश्वस्त आहे. त्यामुळे मी म्हणजे शिवसेना असे कोणी मानू नका.  पक्षाला वेठीस धरू नका. पालिका निवडणुकीत सेनेचा पराभव का झाला याचा  धडा घ्या. निवडणुका जिंकण्यासाठी नवीन यंत्रणा उभी करावी लागेल. एक-एक मोती निवडून मोत्याचा हार आपण विणला पाहिजे. त्यासाठी स्थानिक स्तरावर नवीन चेहरे पक्षात घ्या. त्यातून पक्ष संघटना वाढेल. इतर पक्षांतील अनेक जण सेनेत येण्यास इच्छुक आहेत, त्यांना पक्षात आणा, पक्ष वाढवा. सैन्य मजबूत असले, तरच सरदाराला वजन मिळते. ओसाड गावची पाटीलकी हवी की, सगळ्यांना सामावून पुढे जायचे हे पहिल्यांदा ठरवा,’ अशा शब्दांत कानपिचक्या दिल्या होत्या. त्यातूनच शिवसेना इतर पक्षांतील ताकदीची माणसे आपल्याकडे ओढण्याच्या प्रयत्नात असल्याचे संकेत मिळाले आहेत. भोसरीतील राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे अथवा ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने या दोन दिग्गजांपैकी एकाला आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न सेना करू शकते, तर पिंपरी मतदारसंघात महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षा व पूर्वाश्रमीच्या शिवसैनिक सीमा सावळे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. चिंचवडमध्ये मात्र सेनेचे पालिकेतील गटनेते व माजी शहरप्रमुख राहुल कलाटे यांनाच पुन्हा सेनेची उमेदवारी मिळेल, असे चित्र आहे.

सेनेला लागली झुरणी

विधानसभेला राज्यभरात विविध पक्षांतील 40 दिग्गज सेनेच्या तिकिटांची मागणी करत होते. सेनेने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी भाजपची उमेदवारी मिळवली. यांतील भोसरीचे महेश लांडगे यांच्यासह 35 जण निवडून आले, याची झुरणी सेनेच्या नेत्यांना लागली आहे, त्यामुळे या वेळी पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम शिवसैनिकांना करावे लागणार आहे.