Wed, May 22, 2019 10:20होमपेज › Pune › सिंहगडावर प्रथमच झाला शिवराज्याभिषेक

सिंहगडावर प्रथमच झाला शिवराज्याभिषेक

Published On: Jun 25 2018 1:52AM | Last Updated: Jun 25 2018 12:31AMपुणे : प्रतिनिधी

हर हर महादेव... जय भवानी, जय शिवराय... छत्रपती संभाजी महाराज की जयचा अखंड जयघोष...  ढोल-ताशा आणि पारंपरिक वाद्यांचा गजर... रांगोळ्यांच्या पायघड्या...भगवे झेंडे घेऊन सिंहगडावर शिवरायांना मानवंदना देण्यासाठी जमलेल्या शिवभक्तांचा जनसागर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेल्या पालखीवर होणारी पुष्पवृष्टी... अशा चैतन्यमय वातावरणात शाहिरी निनादासह सिंहगडावर प्रथमच शिवराज्याभिषेकाचा सुवर्णक्षण साजरा झाला. इतिहासात घडलेला हा सुवर्णक्षण पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी शिवभक्तांनी गडावर मोठ्या संख्येने हजेरी लावली. 

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, पुणे महानगरच्या वतीने तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती दिनानिमित्त किल्ले सिंहगड येथे भव्य अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार भीमराव तापकीर, पश्चिम महाराष्ट्र सहमंत्री विवेक कुलकर्णी, पुणे महानगर मंत्री किशोर चव्हाण, डॉ. शीतल मालुसरे, अजित आपटे, शाहीर हेमंत मावळे, शाहीर श्रीकांत रेणके, नगरसेविका वृषाली चौधरी, प्रसन्न जगताप, रमेश कोंडे, लाला जावळकर, सचिन पासलकर, शरद जगताप आदी उपस्थित होते. 

अभिवादन सोहळ्याची सुरूवात राजाराम पुलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकापासून ते सिंहगडापर्यंत दुचाकी रॅलीने झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेल्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ. शीतल मालुसरे यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला. यावेळी शाहीर श्रीकांत रेणके यांनी शाहिरीतून शिवरायांना मानवंदना दिली. साईनाथ कदम, समीर रुपदे, धनंजय गायकवाड, सचिन लोहोकरे, योगेश देशपांडे, संजय पवळे, नाना क्षीरसागर, रवी बोडके, सचिन गुळाणीकर, विशाल कडू यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.  

सिंहगडावर  शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे 

स्वराज्याची निर्मिती करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांची एकही प्रतिमा गडावर नाही. त्यामुळे सर्वांकरीता दैवत असलेल्या शिवरायांची मेघडंबरीसहित  प्रतिमा सिंहगडावर बसविण्यात यावी. सर्वच गड-किल्ल्यांवर अशा प्रतिमा बसविण्यात याव्या. याकरीता महाराष्ट्र शासन, पुरातत्व विभाग व संबंधित खात्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी किशोर चव्हाण यांनी केली.