Wed, Jul 17, 2019 20:50होमपेज › Pune › पहिल्यांदाच सिंहगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक होणार

पहिल्यांदाच सिंहगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक होणार

Published On: Jun 21 2018 4:03PM | Last Updated: Jun 21 2018 4:05PMपुणे : प्रतिनिधी

शिवराज्याभिषेकाचा उत्सव प्रथमच सिंहगडावर साजरा होणार आहे. विश्व हिंदू परिषद व बजरंग दल पुणे महानगरच्या वतीने तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले सिंहगड येथे अभिवादन सोहळ्‌याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक २४ जून रोजी सकाळी १० वाजता सिंहगडावर पालखी सोहळा व मिरवणूक काढण्यात येणार आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषद, बजरंग दल महानगरमंत्री किशोर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी श्रीकांत चिल्लाळ, तुषार कुलकर्णी, राजीव कुर्‍हाडे, नितीन महाजन, केतन घोडके, श्रीपाद रामदासी उपस्थित होते. अभिवादन सोहळ्याचा प्रारंभ रविवारी सकाळी ८ वाजता राजाराम पुलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकपासून आयोजित विराट दुचाकी रॅलीने होणार आहे. या रॅलीमध्ये ७०० दुचाकींवरुन २ हजार शिवभक्त सहभागी होणार असून विठ्ठलवाडी, हिंगणे, माणिकबाग, वडगांव, धायरी फाटा, किरकिटवाडी, खडकवासला, सिंहगड पायथा या मार्गीने सिंहगडावरील वाहनतळ येथे रॅलीचा समारोप होईल. 

केतन घोडके म्हणाले, पालखी मिरवणुकीत ढोल-ताशा पथक, शंखनाद पथक आदी सहभागी होणार आहेत. सिंहगडावरील वाहनतळापासून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीपर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ. शितल मालुसरे यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीस अभिषेक होणार आहे. तसेच, तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे पूजन देखील करण्यात येणार आहे. शाहीर श्रीकांत रेणके यांचा शाहिरी कार्यक्रम होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. बाळ महाराज (इचलकरंजी) हे शिवरायांचा राज्याभिषेक या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. सिंहगडावरील मंदिरे तसेच छत्रपती राजाराम महाराज यांचे पूजन देखील यावेळी होणार आहे.