Wed, Jul 17, 2019 10:20होमपेज › Pune › पुणे : दुपारी १२ वाजता सुटणारी शिवनेरी रद्द 

पुणे : दुपारी १२ वाजता सुटणारी शिवनेरी रद्द 

Published On: Feb 18 2018 2:15PM | Last Updated: Feb 18 2018 2:15PMपुणे: प्रतिनिधी 

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने चालविण्यात येणारी प्रतिष्ठित, आरामदायी व वातानुकूलित शिवनेरी सेवा सध्या या ना त्या कारणाने चर्चेत येत आहे. खडकी येथे अचानक डिकी उघडत दोन जणांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण, नाशिक येथे निखळलेले चाक, कोल्हापूर येथे लागलेली आग असो, शिवनेरीची सामान्यांमध्ये असणारी विश्‍वासार्हता दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.  गेल्या 4-5 दिवसांपासून स्वारगेटहून बोरिवलीकरिता दुपारी 12 वाजता सुटणारी शिवनेरी आयत्या वेळी रद्द करण्यात येत असून यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. 

दुपारी 12 वाजता सुटणारी शिवनेरी बोरिवली येथे सायंकाळी 4.30 वाजता पोहोचणे अपेक्षित असून तीच बस बोरिवली येथून सायंकाळी 6 वाजता सुटून स्वारगेट येथे रात्री 10.30 वाजता पोहोचणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून स्वारगेटहून दुपारी 12 व 1 वाजताच्या दोन्ही बस मिळून एकच बस सोडली जात असून ती दुपारी सव्वा वाजता सोडण्यात येते. ही बस बोरिवली येथे सायंकाळी 5.30 वाजता पोहोचते व तीच बस बोरिवलीहून स्वारगेटकरिता सायंकाळी 7 वाजता सुटते. 

सायंकाळी 6 व 7 वाजताची बस देखील एकच सोडली जात असल्याने बोरिवली येथून स्वारगेटला येणार्‍या प्रवाशांचे देखील हाल होतात. दरम्यान, दै. पुढारीच्या प्रतिनिधीच्या बाबतीत हा प्रकार शुक्रवारी (दि. 16) घडला असल्याने त्याने याबाबत बोरिवली आगारात विचारणा केली असता दुपारी बारा वाजताची बस स्वारगेट आगाराची असून वारंवार असा प्रकार होत असल्याचे तेथील अधिकार्‍याने सांगितले. याबाबत विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकाराबाबत अधिक माहिती घेतली जाईल, असे उत्तर मिळाले. 

तोटा होत असल्याने फेरी रद्द

शनिवार व रविवार वगळता स्वारगेटहून दुपारी 12 व बोरिवली येथून सायंकाळी 6 वाजता सुटणार्‍या शिवनेरीला फारशी गर्दी नसते, यामुळे प्रवाशांची गर्दी कमी असल्याच्या दिवशी फेरीच रद्द करण्यात येते, असे धक्कादायक उत्तर दै. पुढारीला एसटीच्या एका अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर दिले. तोटा भरून काढण्याकरिता हे पाऊल उचलले जाते असेही त्याने नमूद केले. दरम्यान, दुपारी 12 व सायंकाळी 6 वाजताच्या गाड्या स्वारगेट व बोरिवली येथून सुटतात असे कागदोपत्री असल्याने प्रवाशांकडून तिकीट काढले जाते व त्यांना त्या वेळचे तिकीट देखील दिले जाते. फेरी रद्द होणार असेल तर एसटीकडून त्या वेळचे तिकीट तरी मग कशाला देण्यात येते, असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.