Sun, Mar 24, 2019 10:30होमपेज › Pune › शिवमंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलली

शिवमंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलली

Published On: Aug 14 2018 1:06AM | Last Updated: Aug 13 2018 10:53PMपिंपरी : श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने शहरातील शिवमंदिर तसेच प्राचीन शिवालयात भाविकांनी हजेरी लावली होती. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. यावेळी भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. 

पिंपरी, चिंचवड, भोसरी, पिंपळेगुरव, दापोडी, फुगेवाडी यासह शहरातील विविध भागातील शिवमंदिरात भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. दिवसभर पाऊस सुरू असूनही भाविकांची रीघ वाढतच होती. आजच्या पवित्र दिवशी अभिषेक करण्यासाठी तसेच पूजा करण्यासाठी भाविकांची मोठी रांग पहायला मिळाली. या वेळी भाविकांना दर्शन मिळावे यासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून आवश्यक ती उपाययोजना करण्यात आली होती. दिवसभर शहरात शिवनामाचा गजर तसेच ओम नमो शिवायचा मंत्र जप कानी पडत होते. 

धनेश्‍वर मंदिरात भाविकांची गर्दी

पिंपरी : श्रावणी सोमवारनिमित्त चिंचवड गावातील धनेश्वर मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. धनेश्वर मंदिर हे चिंचवड गावातील प्राचीन शिवालय असल्याने दरवर्षी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. धनेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांना दर्शनाचा लाभ घेता यावा, यासाठी दर्शनाची सोय करण्यात आली होती.