Thu, Apr 25, 2019 03:33होमपेज › Pune › पिंपरीत शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा उभारणार

पिंपरीत शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा उभारणार

Published On: Jan 17 2018 2:02AM | Last Updated: Jan 17 2018 1:09AM

बुकमार्क करा
पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी गावातील भैरवनाथ मंदिर चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. सातारा येथील शिल्पकार संजय कुंभार यांनी  प्रस्तावित पुतळ्याचे क्ले मॉडेल तयार केले असून, महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाच्या मान्यतेनंतर ब्राँझ पुतळा बनविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

पिंपरी गावात भैरवनाथ मंदिर चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती उभा पुतळा आहे, त्याऐवजी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ ब्राँझचा पुतळा बसविण्यात येणार आहे. हा पुतळा 10 फूट उंच असेल. महापालिकेने प्रस्तावित पुतळ्याच्या कामासाठी ऑनलाईन कोटेशन मागविले होते. त्यात सातारा येथील शिल्पकार संजय कुंभार यांनी दिलेला 28 लाख रुपये दर कमी असल्याने पालिकेने त्यांना प्रस्तावित पुतळ्याचे क्ले मॉडेल बनविण्यास सांगितले. त्यानुसार कुंभार यांनी या पुतळ्याचे क्ले मॉडेल तयार केले आहे. नगरसेवक संदीप वाघेरे यांनी सातारा येथे जाऊन पुतळ्याची पाहणी केली.

कुंभार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नेहरूनगर स्मशानभूमी येथील वैकुंठशिल्प; तसेच पिंपळे गुरव येथे 40 फुटी डायनॉसॉर ही शिल्प उभारणीची कामे केली आहेत. कला संचालनालयाच्या मान्यतेनंतर पालिकेने ऑर्डर दिल्यावर सहा महिन्यांत ब्राँझ पुतळा तयार होईल, असे कुंभार यांनी सांगितले.

महापालिकेचे उपअभियंता बी. बी. ओव्हाळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाची दरपत्रक व डिझाईनसाठी मान्यता आवश्यक असते. शिल्पकार कुंभार यांनी बनविलेल्या पुतळ्याची कला संचालनालय पाहणी करेल. त्यांनी मान्यता दिल्यावर टेंडर प्रक्रिया केली जाईल. कला संचालनाल्यास पत्र दिले आहे. येत्या पंधरा दिवसांत त्यांच्याकडून पाहणी अपेक्षित असल्याचे ओव्हाळ यांनी सांगितले.