Wed, May 22, 2019 15:14होमपेज › Pune › शिवसेनेच्या नव्या वाघांची डरकाळी फुटेना

शिवसेनेच्या नव्या वाघांची डरकाळी फुटेना

Published On: Aug 26 2018 1:29AM | Last Updated: Aug 26 2018 12:16AMपिंपरी : प्रदीप लोखंडे

आगामी निवडणुकीत शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्याच इराद्याने पिंपरी-चिंचवड शहरातही सेनेच्या कार्यकारीणीमध्ये बदल करण्यात आला. शहराध्यक्षपदासह अनेक पदांवर जुन्यासह नव्या तरुण पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. या निवडीवर जुन्या पदाधिकार्‍यांचे नाराजी नाट्यही घडले; मात्र नेमण्यात आलेल्या नव्या पदाधिकार्‍यांकडून कामाची विशेष छाप पडताना दिसत नाही. त्यामुळे जुन्या वाघांपुढे नव्या वाघांची डरकाळीच फुटेना झाल्याचे चित्र आहे. 

पक्षवाढीचा विस्तार करण्यासाठी व आगामी सर्व निवडणुकीत मोठे यश संपादन करण्याचा आदेश पक्षनेतृत्त्वाने दिला आहे. पक्षवाढीसाठी सत्‍तेत मित्रपक्ष असलेल्या भाजपसोबतही दोन हात करा, असा स्पष्ट शब्दात उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील दौर्‍यावेळी आदेश दिला आहे. त्यामुळे शहरातील पदाधिकारी चार्ज होऊन कामाला लागले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेतंर्गत शहरात शिवसेनेचे दोन खासदार तर एक आमदार आहेत. मोठी ताकद असतानाही पक्षाला गटातटाचे ग्रहण लागले असल्याचे चित्र आहे. 

खासदार श्रीरंग बारणे व खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील या दोन खासदारांच्या गटात शहरातील पदाधिकारी विभागले गेले आहेत; मात्र आमचं सर्व सुरळीत असल्याचा दिखावा शहरातील नेते दाखवित आहेत. नुकतीच नवीन शहर कार्यकारिणी नियुक्‍त करण्यात आली. त्यामध्ये आपल्या गटाचे वर्चस्व कसे राहिल यासाठी प्रयत्न होताना दिसले. पक्षविस्तार करण्यासाठी पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये नव्या तरुणांना संधी देण्यात आली. या निवडीवर जुन्या पदाधिकार्‍यांनी नाराजी दर्शवली. तेव्हापासून नवीन पदाधिकार्‍यांना अनुभवी पदाधिकारी मार्गदर्शन करताना दिसत नसल्याचे चित्र आहे. तर नव्या पदाधिकार्‍यांना शहरातील व महापालिकेतील प्रश्‍न समजून घेताना वेळ लागत आहे. त्यामुळे त्यांची विशेष छाप अद्याप तरी पडली नसल्याचे चित्र आहे. 

शिवसेनेकडून महापालिकेच्या विविध प्रश्‍नांवर राहुल कलाटे, सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट आदीसह अनुभवी पदाधिकारी पत्रकार परिषद, आंदोलने, प्रसिद्धीपत्रक काढून आवाज उठवित आहे. शहरातील एकाच प्रश्‍नांवर दोन्ही खासदारांकडून वेगवेगळ्या पत्रकार परिषद घेऊन आवाज उठविला जात आहे. त्याच प्रश्‍नावर शहरातील पदाधिकारीही प्रसिद्धीपत्रक काढून प्रसिद्धी मिळवत आहेत. शहरातील जुन्या व नव्या पदाधिकार्‍यांनी एकमेकांच्या हातात घालून जाण्याऐवजी प्रत्येक जण आपआपले मार्ग शोधत असल्याचे चित्र आहे. 

यामध्ये नवीन पदाधिकार्‍यांना कोठेच स्थान मिळताना दिसत नाही. त्यांनी उठविलेल्या प्रश्‍नांची चर्चा देखील होताना दिसत नाही. पक्षवाढीसाठी व स्वत:ची विशेष ओळख करायची असेल तर नवीन पदाधिकार्‍यांनी आक्रमकपणे आंदोलने घेणे गरजेचे असल्याची चर्चा शहरात होत आहे. सेनेच्या नव्या वाघांची डरकाळी फुटणार का? हा विषय उत्सुकतेचा बनला आहे.