होमपेज › Pune › शिवसेना गटनेत्यांनी केले भाजपला ‘लक्ष्य’

शिवसेना गटनेत्यांनी केले भाजपला ‘लक्ष्य’

Published On: Jul 25 2018 1:38AM | Last Updated: Jul 24 2018 11:34PMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांनी  भाजपला चांगलेच लक्ष्य केले आहे. स्मार्ट सिटीवर भाजपने परस्पर नियुक्त्या  केल्यापासून सुरू झालेला हा सिलसिला अजून संपायला तयार नाही. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात राजशिष्टचाराचे उल्लंघन झाल्याचा मुद्दा उपस्थित करून कलाटे यांनी भाजपला पुन्हा एकदा घेरले आहे.महापालिकेच्या सन 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत सत्तांतर झाले. भाजपने सत्ता संपादन केली. मात्र विरोधकांना विश्वासात न घेता भाजपने प्रत्येक गोष्ट दामटून नेण्याचा प्रयत्न केला.  स्मार्ट सिटीवर शिवसेनेच्या गटनेत्याला न विचारता परस्पर प्रमोद कुटे यांची नियुक्ती केल्याने बराच वाद झाला कलाटे यांनी न्यायालयात धाव घेतली.

राष्ट्रवादीच्या कार्यकाळात विरोधकांना सन्मानाची वागणूक दिली जात होती. गटनेत्यांची नावे जाहिराती, निमंत्रण पत्रिका असत मात्र भाजपने यास फाटा दिला. विशेष अतिथी म्हणून आ. लक्ष्मण जगताप व आ. महेश लांडगे या दोन्ही आमदारांची नावे वर तर शिवसेनेच्या खासदार, आमदारांची नावे खाली टाकली जावू लागली. विरोधी पक्षातील गटनेत्यांची नावे वगळली जावू लागली. गेल्या वर्ष सव्वा वर्षापासून हाच खेळ सुरू आहे. 

कलाटे यांनी भाजपला काटशह देण्यासाठी मे महिन्यात महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते आपल्या वाकड पुनावळे भागातील विकासकामांची उद्घाटने करून घेतली. या कार्यक्रमाबाबत अंधारात ठेवल्याने  आ.  लक्ष्मण जगताप, पक्षनेते  एकनाथ पवार यांनी अधिकार्‍यांना फैलावर घेतले.संबंधीत अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची शिफारस स्थायी समितीने  केली. यामुळे कलाटे यांनी पालिकेच्या उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमांसाठी काही नियमावली आहे काय? अशी लेखी विचारणा प्रशासनाकडे केली. प्रशासनाने अशा प्रकारची नियमावली नाही. महापौरांच्या सूचनेनुसार कार्यक्रमाची आखणी केली जाते. असे उत्तर दिले  त्यावरून ही पारंपारिक पद्धत असून भाजपने त्यात परस्पर बदल केल्याचे स्पष्ट झाले.   याबद्दल कलाटे यांनी संताप व्यक्त केला. अन्य महापालिकांचा अभ्यास करून पालिकेच्या  कार्यक्रमासाठी नियमावली बनविण्याची मागणी केली.

भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन चिंचवड मतदारसंघात नवीन  गृह प्रकल्पांना  परवानगी न देण्याच्या स्थायीच्या निर्णयावरही कलाटे यांनी कडाडून टीका केली . हा निर्णय बिल्डरांना सत्ताधार्‍यांच्या दावणीस बांधण्याचा प्रकार आहे, यामागे मोठे अर्थकारण आहे असा आरोप त्यांनी केला. पालिकेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयोजित क्रांतिवीर चापेकर संग्रहालय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमास कलाटे यांनी उपस्थिती दर्शवली.  व्यासपीठावर भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते पहिल्या रांगेत अन खासदार, आमदार, विविध पक्षाचे गटनेते यांना बसायला जागा नाही हे चित्र पाहून त्यांनी  संताप व्यक्त केला.  आयुक्त श्रावण हर्डीकर व पक्षनेते एकनाथ पवार यांना धारेवर धरले. या प्रकारास आयुक्तच जबाबदार आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर हे सारे घडत असताना ते निमूटपणे पाहत होते. आयुक्त  भाजपचे पदाधिकारी असल्यासारखे वागतात, असा हल्लाबोल कलाटे यांनी केला. आयुक्तांनी  विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचा मानसन्मान ठेवावा. अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशाराही  दिला. एकूणच कलाटे यांनी भाजपला लक्ष्य केले असून त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.