Sun, Jul 21, 2019 07:51होमपेज › Pune › मोठमोठ्या ‘डॉन’ना शिवसैनिकांनी लोळविले : खा. संजय राऊत 

मोठमोठ्या ‘डॉन’ना शिवसैनिकांनी लोळविले : खा. संजय राऊत 

Published On: Sep 08 2018 1:33AM | Last Updated: Sep 08 2018 1:05AMपिंपरी : प्रतिनिधी

इथे कोणी डॉन असले तरी घाबरण्याचे कारण नाही. मुंबईत अशा डॉनना फाटक्या शिवसैनिकांनी माती चारली, हे लक्षात घ्या व कामाला लागा, असे आवाहन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी येथे शिवसेना पदाधिकार्‍यांना केले.

गटप्रमुख हाच शिवसेनेचा सर्वात मोठा प्रचारक आहे. त्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी गटप्रमुखांचे जाळे निर्माण करा, त्यांच्याशी संवाद साधा, ताकद द्या, असा मूलमंत्र त्यांनी दिला. निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील. निवडणुका डोळयासमोर ठेवून पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करा, असेही ते म्हणाले.  

मावळ, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकार्‍यांच्या मतदार संघनिहाय बैठका संभाजीनगर येथे  पार पडल्या. या बैठकांमध्ये संजय राऊत यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना राज्य संघटक गोविंद घोळवे, संपर्क प्रमुख बाळा कदम, गणेश जाधव, गिरीश सावंत, वैभव थोरात, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे,  शहरप्रमुख योगेश बाबर,  महिला आघाडी संपर्क संघटक लतिका पाष्टे, वैशाली सूर्यवंशी, शहरसंघटक सुलभा उबाळे, सल्लागार मधुकर बाबर, विधानसभा प्रमुख प्रमोद कुटे, अनंत कोर्‍हाळे, धनंजय आल्हाट, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, अ‍ॅड. सचिन भोसले आदी उपस्थित होते.

खासदार  राऊत म्हणाले, भाजप सध्या ज्या बूथनिहाय कमिट्या नेमत आहे, ती मूळ संकल्पना शिवसेनेची आहे. त्यामुळे शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने गटप्रमुखांचे महत्त्व ओळखून त्यांना ताकद दिली पाहिजे. पक्षसंघटना बांधणीसाठी कष्ट घेतले पाहिजे. इतर संस्था, संघटना,  सर्व घटकांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी नेत्यांनी मीपणा, अहंमपणा सोडून सामान्य कार्यकर्त्याला महत्व दिले पाहिजे. शिवसेनेच्या विचारधारेशी प्रामाणिक असलेल्या कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या तातडीने करा. त्यांच्या मनात ऊर्जा निर्माण करा, यश आपलेच आहे. असे ते म्हणाले. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे त्यामुळे मीच मोठा या भ्रमात राहू नका, असा टोलाही त्यांनी लगावला    

शिवसेनेने सातत्याने चुकीच्या कामांविरोधात आवाज उठवित  सरकारविरोधात वातावरण निर्माण केले असून, त्यामुळे सामान्यांमध्ये भाजप सरकारविरोधात कमालीचा रोष आहे. काँग्रेस - राष्ट्रवादीबद्दल लोकांना तिटकारा आहे. 2014 मधील राजकीय परिस्थिती आज बदलली आहे.  2019 चा सूर्य शिवसेनेसाठी उगविणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मावळ - शिरूरचे दोन्ही खासदार शिवसेनेचेच असतील. तर, विधानसभेचे तीनही आमदार शिवसेनेचेच असतील,  असेही खा. राऊत म्हणाले.  खा. श्रीरंग बारणे म्हणाले, यापुढील काळात हा जवळचा तो लांबचा असे पाहून नियुक्त्या केल्या जाणार नाहीत. केवळ खुर्च्या उबविण्यासाठी पदे न देता संघटनेचे प्रामाणिकपणे काम करणार्‍या, पक्षादेश पाळणार्‍यांनाच कामाची संधी दिली जाईल. निवडणुका जिंकण्यासाठी नवीन यंत्रणा उभी केली जाईल. शिवसेना शहर महिला संघटिका सुलभा उबाळे म्हणाल्या की, पक्षाचे दोन खासदार, आमदार यांची वज्रमूठ झाली तरच समोरच्यांना वचक बसेल.