होमपेज › Pune › शिवसंपर्क अभियानात शिवसैनिकांचा नाराजीचा सूर

शिवसंपर्क अभियानात शिवसैनिकांचा नाराजीचा सूर

Published On: Feb 27 2018 1:57AM | Last Updated: Feb 27 2018 1:46AMपिंपरी :नंदकुमार सातुर्डेकर

शिवसेनेने येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारीस वेग दिला आहे. त्यासाठी नुकतेच पिंपरी, चिंचवड, भोसरी विधनसभा मतदारसंघांत शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले. या अभियानादरम्यान शिवसैनिकांनी नाराजीचा सूर लावला. निवडणुका आल्या की, शिवसैनिकांना कामाला लावले जाते. पदे देताना छोट्या छोट्या समित्या, विशेष कार्यकारी अधिकारी पदावरही शिवसैनिकांचा विचार होत नाही. कार्यकर्त्यांनी सुचवलेली कामे मार्गी लागत नाहीत, अशा तक्रारी कार्यकर्त्यांनी केल्या. महापालिका निवडणुकीत बाहेरून आयात केलेले आज कुठे आहेत, असा सवाल कार्यकर्त्यांनी केल्याचे समजते.

केंद्रात, राज्यात सत्तेत असलेला भाजप आपल्याला मित्र म्हणून चांगली वागणूक देत नाही,  अशी शिवसेनेची भावना झाली आहे. त्यातच गुजरात, राजस्थानमधील निवडणुकांमध्ये जनमत भाजपच्या हळूहळू विरोधात चालल्याचे समोर आल्याने शिवसेनेने ‘एकला चलो रे’चा नारा देत लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विभागीय संपर्क नेते म्हणून खा. संजय राऊत, संपर्क समन्वयकपदी रवींद्र मिर्लेकर यांची नियुक्ती केली आहे. 

पिंपरी-चिंचवड संपर्क प्रमुख म्हणून बाळा कदम; तसेच वैभव थोरात, गिरीश सावंत, हरिश्‍चंद्र ठाकूर यांची अनुक्रमे चिंचवड, पिंपरी व भोसरी विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख म्हणून नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शिवसेना शहरप्रमुखपदी योगेश बाबर यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीवरून उठलेले वादळ काहीसे शांत झाल्यानंतर शहरात तिन्ही विधानसभा मतदारसंघांत शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले. 

शिवसंपर्क अभियानांतर्गत संघटनेची सद्यःस्थिती, बांधणी, मागील विधानसभा निवडणुकीत काय झाले, आता मतदारांचा कल काय आहे, मतदारसंघाचे प्रश्न काय आहेत, याबाबत आढावा घेण्यात आला. या अभियानास विविध भागातून पाठविण्यात आलेले संपर्क प्रमुख निरीक्षक,  शहरप्रमुख योगेश बाबर, महिला शहर संघटिका सुलभा उबाळे, पालिकेतील गटनेते राहुल कलाटे, चिंचवड विधनसभा मतदारसंघ प्रमुख गजानन चिंचवडे, भोसरीचे धनंजय आल्हाट यांच्यासह सेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.  पिंपरी विधानसभा मतदारसंघात शिवसंपर्क अभियानात निरीक्षक व संपर्क प्रमुख सत्यवान उभे यांच्यासमोर शिवसैनिकांनी तक्रारींचा पाढा वाचला. आ. गौतम चाबुकस्वार हे काँग्रेसच्याच गराड्यात असतात. 

छोट्या छोट्या शासकीय कमिट्या, विशेष कार्यकारी अधिकारी पदांवरही शिवसैनिकांना संधी दिली नाही. आपल्या जवळच्यांनाच पदे वाटली, असा आरोप शिवसैनिकांनी केला. कार्यकर्त्यांनी सुचविलेली कामे मार्गी लागत नाहीत. त्यांनी कार्यपद्धतीत सुधारणा न केल्यास ही जागा पुन्हा जिंकणे अवघड होईल, असा इशारा देण्यात आला.  महापालिका निवडणुकीत बाहेरून आलेल्यांना आपण तिकिटे दिली ती माणसे आज शिवसैनिक म्हणून सेनेत काम करताना दिसत नाहीत. निवडणुका आल्या की, शिवसैनिकांना कामाला लावले जाते, त्यांची एरवी आठवण होत नाही, अशा संतप्त भावना या वेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. 

निरीक्षक संपर्क प्रमुख सत्यवान उभे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेतल्या; मात्र येत्या विधानसभा निवडणुकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका जाहीर केली आहे. 150 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे आपापसातील वाद, मतभेद बाजूला सारून कामाला लागा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले  भोसरीत शिवसंपर्क अभियानात  जुन्या-नव्यांचा समन्वय साधून नव्याने पक्षबांधणी  करण्याची गरज शिवसैनिकांनी व्यक्त केली. चिंचवड विधानसभा मतदारसंघात शिवसंपर्क अभियानात अनधिकृत बांधकामे नियमितीकरण, शास्तीकर रद्द करण्याचा विषय, पाणी प्रश्न, पाणीपट्टीवाढ या जनतेच्या प्रश्नांवर शिवसेनेने आंदोलने हाती घ्यावीत, अशा अपेक्षा कार्यकर्त्यांनी  व्यक्त केल्या.