Mon, Apr 22, 2019 03:51होमपेज › Pune › शिवछत्रपतींची न्यूयॉर्कमध्ये भव्य मिरवणूक (Video)

शिवछत्रपतींची न्यूयॉर्कमध्ये भव्य मिरवणूक (Video)

Published On: Aug 22 2018 1:23AM | Last Updated: Aug 22 2018 8:18AMपुणे : प्रतिनिधी

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्क येथे दि. 19 ऑगस्टला इंडिया डे परेडचे आयोजन करण्यात आले होते. या परेडमध्ये छत्रपती फाउंडेशनच्या वतीने प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज यांचा कीर्तीरथ साकारण्यात आला होता. ‘शिवछत्रपती कीर्तीरथ’ हा 2018 च्या न्यूयॉर्क परेडचा शो-टॅपर ठरला. जल्लोष ग्रुपचे प्रमुख मुकुंद खिस्ती व आर्याबागचे कल्याण तावरे यांच्यासह अनेक संस्थांनी या वेळी शिवाजी महाराजांना अभिवादन केले. भारतातून न्यूयॉर्कमधील या इंडिया परेडसाठी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता कमल हसन, अनुपम खेर, श्रृती हसन; तसेच क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स हे आवर्जून उपस्थित होते.

या रथावर पुढच्या भागात शिवाजी महाराज व मावळ्यांची भूमिका युवकांनी दिमाखदार अभिनय व आकर्षक पोषाखाद्वारे जिवंत केली, तर मागच्या भागात राष्ट्रमाता जिजाऊ बाळ शिवबांना मार्गदर्शन करीत असल्याचा प्रसंग, अभिनयातून दर्शविण्यात आला. 100 हून अधिक युवकांच्या चमूने ढोल-ताशा व लेजीम नृत्यातून महाराष्ट्रातील लोककलेचा आगळावेगळा अनुभव अमेरिकेतील लोकांना दिला. या वेळी शिवाजी महाराजांचे कर्तृत्त्व, जिजाऊंची स्वराज्य संकल्पना व हिंदवी स्वराज्याचा इतिहासाबद्दल माहितीपत्रक उपस्थितांना वाटण्यात आले. महिला वादक असलेल्या ढोल-ताशा पथकाचे नेतृत्त्व शिल्पा घुले यांनी केले. 

 

छत्रपती फाउंडेशन न्यूयॉर्क ही संस्था गेल्या 6 वर्षांपासून शिवजयंती, जिजाऊ जयंती, अहिल्यादेवी जयंती, आंबेडकर जयंतीच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक उपक्रम राबवत असते. फाउंडेशनचे संस्थापक स्वप्निल खेडेकर व अध्यक्ष विनोद झेंडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, तर अल्बनी ढोल-ताशा पथकाचे संस्थापक अध्यक्ष कल्याण घुले यांच्या पुढाकाराने पथकातर्फे यावर्षी न्यूयॉर्क राज्याची राजधानी अल्बनी येथे शिवराज्यावर आधारित ऐतिहासिक नाट्य सादर केले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी छत्रपती फाउंडेशनचे प्रसिद्धी प्रमुख गौरव दळवी, संघटनप्रमुख रूपेश नाइक, न्यूयॉर्क स्टेट अध्यक्ष प्रशांत भुसारी, न्यूजर्सी स्टेट अध्यक्ष रोहन रायगुडे, न्यूयॉर्क स्टेट उपाध्यक्ष अभिनव देशमुख व न्यूयॉर्क स्टेट युवक अध्यक्ष ॠषिकेश माने व शरद कोट्टाकह यांनी अथक प्रयत्न केले. ढोलवादकांचे नेतृत्त्व राजेंद्र गाडे व जगदीश सोळंकी, तर ताशावादकांचे नेतृत्त्व संदीप जाधव व अनिल कुलकर्णी यांनी केले. संपूर्ण पथकाच्या संचालनाची जबाबदारी भूषण पाटील यांनी सांभाळली.