होमपेज › Pune › ‘एसआरटी’ पद्धतीने शिरगावात भात लागवड 

‘एसआरटी’ पद्धतीने शिरगावात भात लागवड 

Published On: Jun 24 2018 1:35AM | Last Updated: Jun 24 2018 12:23AMशिरगाव : वार्ताहर 

शिरगावात  एसआरटी तंत्रज्ञानाचा वापर करून भात लागवडीचा प्रयोग  येथील शेतकरी प्रवीण गोपाळे यांनी केला आहे.  गोपाळे हे आपल्या शेतात गेल्या तीन वर्षापासून हा प्रयोग करत असून त्यात ते यशस्वी झाले आहेत.  तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून आपली भात लागवड करावी असे आवाहन प्रवीण गोपाळे यांनी यावेळी केले आहे. 

एस.आरटी या तंत्रज्ञानाच्या साह्याने जर भात लागवड केली तर दरवर्षी लागणार्‍या खर्चापेक्षा 50 टक्के खर्च कमी येतो.  त्यामुळे हे तंत्रज्ञान शेतकर्‍यांसाठी वरदान ठरू पाहत आहे. जर या पद्धतीने भात लागवड केली तर येणारे उत्पादनही पारंपरिक लागवडीपेक्षा दुपटीने जास्त येते शिवाय पिकांची रोग प्रतिकारशक्‍ती जास्त असते. 

या पद्धतीने भाताची लागवड करण्यासाठी गोपाळे यांनी एक लोखंडाचा सांगाडा तयार केला आहे. त्यामुळे बियाणे योग्य पद्धतीने जमिनीत पुरले जाते. भात पेरताना दोन रोपांमधील अंतर 5 इंच व दोन रांगेमधील अंतर अर्धा फूट ठेवले आहेे. त्यामुळे सर्व रोप आणि सर्व रांगा सारख्या दिसतात. यामुळे  आंतरमशागत करताना शेतकर्‍यांना त्रास होत नाही. 

या पद्धतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा वाफे तयार केल्यास पुढील पाच वर्षे लागवड करण्यासाठी वापरता येतात. त्यामुळे दरवर्षी नागरणी, कुळवणी, माती भाजणी यावर होणारा खर्च वाचतो. शेतकर्‍यांनाी या पद्धतीचा वापर करून पीक घेतल्यास याच शेतात दुसरे पीक घेण्यासाठी रासायनिक खताची गरज अर्ध्यापेक्षा कमी होत असल्याचे गोपाळे यांनी सांगितले.