Sun, Aug 25, 2019 19:23होमपेज › Pune › साईचरणी १४ कोटी ८२ लाखांचे दान

साईचरणी १४ कोटी ८२ लाखांचे दान

Published On: Jan 03 2018 1:16AM | Last Updated: Jan 03 2018 12:50AM

बुकमार्क करा
शिर्डी : प्रतिनिधी

शिर्डी येथे 23 डिसेंबर 2017 ते 1 जानेवारी 2018 या काळात नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त सुमारे 9 लाख भक्तांनी साईदर्शन घेतले. दरम्यान, या कालावधीत सुमारे 14 कोटी 82 लाखांचे  दान साईचरणी प्राप्त झाल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली.  शिर्डीमध्ये 22 डिसेंबर ते 1 जानेवारी याकाळात 1 लाख भाविकांनी सशुल्क दर्शन पासेसचा लाभ घेतला. या कालावधीत रोख रकमेसह सोने-चांदी, डेबिट-क्रेडिट कार्ड, ऑनलाईन, चेक-डीडी, मनीऑर्डर व परकीय चलन देणगी स्वरुपात 14 कोटी 82 लाखांचे  दान प्राप्त झाले.

यामध्ये दक्षिणा पेटीमध्ये 8 कोटी 34 लाख, देणगी काऊंटर 3 कोटी 8 लाख 29 हजार, डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे 1 कोटी 27 हजार, ऑनलाईनद्वारे 64 लाख 23 हजार, चेक-डीडीद्वारे 86 लाख 12 हजार, मनीऑर्डरद्वारे 10 लाख 2 हजार रुपये, अशा देणगीचा समावेश आहे. यामध्ये 1177.170 ग्रॅम सोने व 19,955 ग्रॅम चांदीचाही समावेश आहे. तसेच अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका, नेपाळ, ओमान, कुवैत, केनिया, मॉरिशस, व्हिएतनाम, थायलंड, अरब अमिरात, कतार, चीन व जपान अशा 21 देशांतील साईभक्तांनी अंदाजे 41 लाख 22 हजार रुपये किंमतीचे परकीय चलन संस्थानच्या दक्षिणा पेटीत टाकले आहे.

या कालावधीत श्री साईबाबा संस्थानच्या श्री साई प्रसादालयात 6 लाख 59 हजार 380 साईभक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर 1 लाख 24 हजार भाविकांनी नाश्ता पाकिटाचा लाभ घेतला. या कालावधीत दर्शन रांगेमध्ये 9 लाख 14 हजार भाविकांनी मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचा लाभ घेतला असून, 5 लाख 66 हजार 900 लाडू प्रसाद पाकिटांची विक्री झाली आहे. त्यातून संस्थानला 1 कोटी 41 लाख 72 हजार 500 रुपये प्राप्त झाले आहेत. याकाळात श्री साईबाबा संस्थान प्रकाशित 55 हजार 432 दैनंदिनींची विक्री झाली असून, दिनदर्शिका व इतर साहित्यांद्वारे 88 लाख 40 हजार रुपये प्राप्त झाले आहेत. लाडू, दैनंदिनी, दिनदर्शिका इत्यादींची विक्री ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर केली जात असल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले.