Tue, Mar 19, 2019 03:39होमपेज › Pune › शीतल शिंदेंचा राजीनामा नाराजीतून की राजकीय खेळी

शीतल शिंदेंचा राजीनामा नाराजीतून की राजकीय खेळी

Published On: Apr 13 2018 1:19AM | Last Updated: Apr 13 2018 12:59AMपिंपरी : संजय शिंदे 

स्थायीचे लाभाचे पद मिळविण्यासाठी नगरसेवक जिवाचे रान करतात; परंतु मिळालेल्या सदस्यत्वाचा राजीनामा शीतल शिंदे यांनी दिला आणि तो लगेच मंजूर झाला. दुसर्‍यांदा दिलेला राजीनामा त्वरित मंजूर करण्यात येतो, याला राजकीय वास असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. शिंदे यांनी राजीनामा स्थायीच्या अगामीचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी की महापौर निवडीमध्ये भोसरीला छेद देण्यासाठी ही खेळी असल्याबाबत भाजपसह इतर पक्षात चर्चा आहे.

सीमा सावळे यांची स्थायी अध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतर त्याजागी आ. महेश लांडगे समर्थक राहुल जाधव, निष्ठावंत गटाकडून शीतल शिंदे, विलास मडिगेरी यांच्यामध्ये चुरस होती; मात्र 32 वर्षांचा राजकीय अनुभवाचा वापर करत शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांनी आ. लांडगे गटाला शह देत ऐन वेळेला ममता विनायक गायकवाड यांचे नाव अंतिम केले. अर्ज भरण्याच्या अगोदर दादा समर्थकांनी राजीनामा  देत दबाब टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये महापौर नितीन काळजे यांनीही राहुल जाधव यांच्या निवडीमध्ये माझ्या पदाचा अडसर होऊ नये म्हणून महापौरपदाचा ही राजीनामा शहराध्यक्ष म्हणून आ. लक्ष्मण जगताप यांच्याकडे सूपुर्द केला होता; मात्र या राजीनामा नाट्याचा जगतापांच्यावर कोणताच परिणाम दिसून आला नाही. 

जगताप यांनी गायकवाड यांनाच स्थायी अध्यक्षपद देण्याचे ठरविल्यामुळे निष्ठावंत गटाचे इच्छुक असणार्‍या शीतल शिंदे व विलास मडिगेरी यांनाच गायकवाड यांचे सुचक व अनुमोदक करून आपल्या बाजूने वळविले होते. त्यानंतर जगताप आणि लांडगे यांच्यामध्ये बैठक झाल्यानंतर अर्ज भरल्यानुसार ममता गायकवाड यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाद होईल आणि मोरेश्‍वर भोंडवे अध्यक्ष होतील या शक्यतेला बहुमतांनी मात देत ममता गायकवाड अपेक्षेप्रमाणे स्थायी अध्यक्षपदावर विराजमान झाल्या. शीतल शिंदे हे मुळ ओबीसी आहेत. आ. लांडगे समर्थक राहुल यांना स्थायी अध्यक्षपद नाही पण महापौर करण्यासाठी लांडगे यांनी कंबर कसली आहे.

त्यामुळे जाधव हे महापौर होणार असे बोलले जात आहे; मात्र आ. जगताप गटाकडून नगरसेवक शत्रुघ्न काटे यांचे नावही आघाडीवर आहे. राहुल जाधव हे स्थायीच्या तीन बैठकींना अनुपस्थित असल्यामुळे त्यांचे पद गोठविण्यात आले आहे. त्यामुळे महापौर होण्याचा मार्ग खुला झाला आहे; परंतु शीतल शिंदे यांचाही राजीनामा मंजूर करण्यात आल्यामुळे महापौर पदाच्या निवडीमध्ये रंगत निर्माण झाली आहे.