Sun, Aug 25, 2019 12:54होमपेज › Pune › दावा मागे घेण्यासाठी तिने केला चक्क पतीच्या खूनाचा प्रयत्न! 

दावा मागे घेण्यासाठी तिने केला चक्क पतीच्या खूनाचा प्रयत्न! 

Published On: Jul 28 2018 1:39AM | Last Updated: Jul 28 2018 1:23AMपुणे : प्रतिनिधी

पत्नीशी पटत नसल्याने घटस्फोटासाठी न्यायालयात केलेला दावा मागे घेण्यासाठी पत्नीनेच पतीच्या खूनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोघांनी चाकूने वार केल्यानंतर पत्नीने रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, नागरिकांची गर्दी झाल्याने पुढील अनर्थ टळला. दत्तवाडीत ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली असून, याप्रकरणी पत्नीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सखाराम शिवाजी गायकवाड (वय 42, रा. जनता वसाहत, पर्वती) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पत्नी आणि दोघांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा आयशर टेम्पो असून, ते  स्वत:च चालवतात. दरम्यान काही वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला आहे. मात्र, त्यानंतर त्यांच्यात घरगुती वादातून पटत नव्हते. त्यामुळे पत्नी गेल्या दोन महिन्यांपासून माहेरी गेली आहे. दरम्यान फिर्यादी यांनी घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला आहे. दरम्यान गुरुवारी रात्री त्यांच्या एका मित्राची गाडी चांदणी चौकात बंद पडली होती. त्यामुळे ते त्यांचा आयशर टेम्पो घेऊन त्याच्याकडे निघाले होते. ते दांडेकर पुलावर आल्यानंतर त्यांना गाडीची पर्यायी व्यवस्था झाली असल्याचे मित्राने सांगितले. त्यामुळे तेथून परत ना. सी. फडके चौकातून जात होते. ते निलायम ब्रिजजवळ आल्यानंतर लघुशंकेसाठी ते थांबले होते. त्यावेळी अचानक त्यांच्याजवळ पत्नी तसेच तिचा भाऊ आणि आणखी एकजण आल्याचे दिसले. त्यावेळी त्यांनी न्यायालयात केलेले केस मागे नाही तर, तुला बघून घेऊ, असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच, चाकूने त्यांच्या दंडावर व पायावर वार केले. तर, पत्नीने तिच्याजवळील रॉकेल सखाराम यांच्या अंगावर ओतले. मात्र, रॉकेल डोळ्यात गेल्याने मोठ-मोठ्याने आरडा-ओरडा करू लागले. त्यामुळे येथून जाणारे येणार्‍या नागरिकांची गर्दी झाली. गोंधळ आणि गर्दी झाल्याने आरोपी तेथून पसार झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर फिर्यादींना तत्काळ खसगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दत्तवाडी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच धाव घेऊन माहिती घेतली. 
हॉटेलचालकाला खंडणी मागणारा अटकेत

कुख्यात गँगस्टर हेमंत पुजारी याच्या नावाने हॉटेलचालकाकडे दरमहा 50 हजार रुपयांची प्रोटेक्शन मनीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देणार्‍या सराईताला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.चार्ल्स उर्फ देवराज जेम्स थापा (27, बी. टी. कवडे रोड ,मुंढवा) असे त्याचे नाव आहे. थापा याला 2004 साली एका हॉटेलव्यावसायिकाला 1 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणीही त्याला अटक करण्यात आली होती. बंडगार्डन परिसरातील एका हॉटेलच्या मॅनेजरला दूरध्वनी आणि मोबाईलवर फोन करून कुख्यात गँगस्टर हेमंत पुजारी याच्या नावाने पन्नास हजार रुपयांच्या प्रोटेक्शन मनीची मागणी केली. ही मागणी थापा याने केली. तसेच त्याने हॉटेलमध्ये येऊन खंडणी नाही दिली तर जीवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. त्यानंतर खंडणीविरोधी पथकाकडून शहरात त्याचा विविध ठिकाणी शोध घेण्यात जात होता. त्यावेळी पोलिस हवालदार प्रमोद मगर व धीरज भोर यांना मिळालेल्या माहितीनुसार त्याला बाणेर परिसरातील एक हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई सहायक पोलिस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक रघुनाथ जाखव, पोलिस उपनिरीक्षक राहूल घुगे यांच्या पथकाने केली.