Tue, May 21, 2019 12:47होमपेज › Pune › शास्तीकर निकाल महिनाभरात लावू

शास्तीकर निकाल महिनाभरात लावू

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 16 2018 12:56AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांना लावलेल्या शास्तीकरातून सर्वसामान्य नागरिकांची सुटका करण्यासाठी कायदा करण्याचा निर्णय येत्या अधिवेशनात घेण्यात येईल. नागरिकांना शास्तीकर मुक्त केले जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकार्‍यांच्या मुंबईत बुधवारी (दि.14) झालेल्या बैठकीत दिली. 

पिंपरी-चिंचवड शहरातील मागील वर्षभरातील कामाचा आढावा आणि आतापर्यंतची प्रगती यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समवेत त्यांच्या वर्षा निवासस्थानी शहर भाजप पदाधिकार्‍यांची सुमारे दीड तास बैठक झाली. या वेळी महापौर नितीन काळजे, खासदार अमर साबळे, शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, लेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, सदाशिव खाडे, उमा खापरे, संघटक रवी अनासपुरे, राष्ट्रीय सहसंघटक व्ही. सतीश आदी उपस्थित होते.

बैठकीसंदर्भात सत्तारूढ पक्षनेते पवार यांनी पत्रकारांना गुरुवारी (दि.15) माहिती दिली. अनधिकृत बांधकामधारकांना लावण्यात आलेल्या शास्तीकरामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. त्यात विरोधक वातावरण गढूळ करीत आहेत. त्यामुळे शास्तीकराची सक्ती रद्द करून तो पूर्वलक्षीप्रमाणे घेण्याची विनंती पदाधिकार्‍यांनी केली. या संदर्भात येत्या अधिवेशनात निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.आंद्रा-भामा आसखेड धरण पाणी योजना व पवना बंद जलवाहिनी योजना मार्गी लावण्यासंदर्भात संबंधितांची बैठक घेऊन चर्चा करून त्यातून तोडगा काढण्यात येईल. भोसरी, दिघी, तळवडे, मामुर्डी परिसरातील रेडझोन आणि बोपखेल, पिंपळे सौदागर परिसरातील लष्करी हद्दीतील रस्ते प्रश्‍नांबाबत केंद्रीय संरक्षणमंत्र्यांशी चर्चा करून तो प्रश्‍न सोडविण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

पालिकेच्या शहरातील विविध कामांना चालना देण्यासाठी राज्य व केंद्राच्या  परवानग्या मिळवून देण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांशी बैठका आयोजित केल्या जाणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहराच्या कामाचा आढावा घेण्यासाठी दर तीन महिन्यांनी बैठक घेण्याचा निर्णय बैठकीत झाला, असे पवार यांनी सांगितले.