Wed, Mar 27, 2019 04:07होमपेज › Pune › ‘ओव्हररूल’ करण्यात माझा हातखंडा : शरद पवार

‘ओव्हररूल’ करण्यात माझा हातखंडा : शरद पवार

Published On: Jun 19 2018 10:58AM | Last Updated: Jun 19 2018 10:58AMपुणे : प्रतिनिधी

अरुण साधू यांच्या कादंबरीवर आधारित ‘सिंहासन’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. चित्रपटाची प्रभावी मांडणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे कार्यालय आणि निवासस्थान चित्रीकरणासाठी उपलब्ध करून देण्याची विनंती दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी केली होती. त्यावर हे अयोग्य असल्याची मोठी नोट सामान्य प्रशासन विभागाने मला पाठवली होती. पण नोट ‘ओव्हररूल’ करण्यात माझा हातखंडा असल्याने मी मुख्यमंत्री कार्यालय व निवासस्थान चित्रीकरणासाठी उपलब्ध करून दिले. त्यातून अप्रतीम कलाकृती निर्माण झाली, अशी आठवण माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सांगितली. अरुण साधू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ग्रंथाली, अरुण साधू कुटुंबीय व मित्रमंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग, आशय फिल्म क्लब, एआरडी एंटरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारितेशी संबंधित क्षेत्रातील संशोधनासाठी पाठ्यवृत्ती देण्यात येणार आहे. या पाठ्यवृत्तीच्या घोषणेसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते.

याप्रसंगी राज्यसभा खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, अरुण साधू यांच्या पत्नी अरुणा साधू, संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. उज्ज्वला बर्वे, एआरडी एंटरटेन्मेंटच्या अश्विनी दरेकर, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे अध्यक्ष सचिन इटकर, ग्रंथालीचे दिनकर गांगल आदी उपस्थित होते. यावेळी बूट पॉलिश करून शिक्षण घेणार्या दोन विद्यार्थ्यांना पाठ्यवृत्ती देण्यात आली. या वेळी साधू यांच्या कादंबरीवर आधारित ‘झिपर्या’ चित्रपटाचा खेळही दाखविण्यात आला.

पवार म्हणाले, ‘अरुण साधू हे सामाजिक दृष्टी असलेले थोर साहित्यिक होते. त्यांनी मुंबईचे अस्वस्थ वास्तव, लोकलच्या परिसरात राहणार्या तरुणांची सुख-दुः खे प्रभावीपणे मांडली. साधू यांना ज्या गोष्टींची आस्था होती, त्यासंबंधी त्यांनी चिंतन केले. अमरावती येथून मुंबईशी समरस झाले. साधू खर्या आर्थाने मंबई जगले. मुंबईतील अस्वस्थतेला त्यांनी शब्दबद्ध केले. त्यांनी मराठी साहित्याला उच्चतम दर्जा मिळवून दिला. ते कोणत्याही एका चौकटीत न बसणारे साहित्यिक होते.

खा. केतकर म्हणाले, साधू यांनी आपल्या साहित्यातून उपेक्षितांचे दुःख मांडण्यासोबतच विज्ञान आणि तंत्रज्ञानासंबंधीही विपुल लेखन केले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी वृत्तपत्र व्यवसायाशी संबंधित असलेल्या, विज्ञानापासून सामाजिक विषयांपर्यंत संशोधन करणार्या विद्यार्थी, पत्रकारांना ही पाठ्यवृत्ती दिली जाणार आहे.

साधू यांच्या स्मृतिप्रीत्यार्थ 25 सप्टेंबर रोजी पहिली पाठ्यवृत्ती दिली जाणार आहे. यावेळी प्रा. डॉ. उज्ज्वला बर्वे यांनी या पाठ्यवृत्तीची माहिती दिली. अश्विनी दरेकर यांनी प्रास्तावित केले, तर सुप्रिया चित्राव यांनी सूत्रसंचालन केले. 

‘अरुण साधूंनी अस्वस्थतेला शब्दबद्ध केले’
‘मराठी साहित्याचा दर्जा सर्वोत्तम कसा राहील, यासाठी अरुण साधू यांनी नेहमीप्रयत्न केले. त्यांनी जे-जे लिखाण केले ते मराठी वाचकांच्या अंतःकरणाला भिडणारे होते. त्यांचे साहित्य आणि लिखाण फक्त मराठीपुरते मर्यादित न राहता ते इतर भाषांमध्येही गेले. त्यांनी आपल्यातील अस्वस्थतेला शब्दबद्ध केले,’ अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार अरुण साधू यांच्या आठवणींना उजाळा दिला.