Thu, Jul 18, 2019 16:29होमपेज › Pune › पवारांच्या कानमंत्रामुळे नगरसेवक ‘चार्ज’

पवारांच्या कानमंत्रामुळे नगरसेवक ‘चार्ज’

Published On: Apr 22 2018 1:13AM | Last Updated: Apr 21 2018 10:52PMपिंपरी : संजय शिंदे

पालिकेमध्ये  होत असलेल्या चुकीच्या कामांना विरोध करा आणि चांगली कामे पुढे घेऊन जा असा कानमंत्र खा. शरद पवार यांनी पक्षाच्या 36 नगरसेवकांना देताच शुक्रवारी (दि.20) झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले. न बोलणारे नगरसेवक, नगरसेविका मुद्दे धरून प्रशासन व सत्ताधार्‍यांना मेटाकुटीला आणताना दिसत होते. हा  बदल शरद पवार यांच्या कानमंत्रामुळेच झाला  अशी चर्चा पालिका वर्तुळात आणि पक्षात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सलग पंधरा वर्षे सत्तेत होती; मात्र 2017 च्या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता प्रस्थापित केली. राष्ट्रवादीचे 36 नगरसेवक निवडून आले. नेहमी सत्तेत राहण्याची सवय आल्यामुळे वर्ष-सव्वा वर्ष आपण अजूनही सत्तेतच आहोत या अविर्भावात राष्ट्रवादीचे नगरसेवक वागत होते. हाताच्या बोटावर मोजावे एवढेच नगरसेवक, नगरसेविका सभागृहात बोलत होते. विरोधी पक्षनेते योगेश बहल नेमके राष्ट्रवादी काँग्रेसचे की सत्ताधार्‍यांचे अशी ओरड खुद्द राष्ट्रवादीमध्येच आहे. 

भाजपचे सरकार केंद्रात आणि राज्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने  हल्लाबोलच्या माध्यमातून राज्यभर रान उठविले. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. भोसरी आणि काळेवाडी येथे दि.10 व 11 रोजी हल्लाबोल आंदोलन झाले. त्याला शहरवासीयांनी भरभरून साथ दिली. 

ग्रामीण भागात सत्ताधार्‍यांच्या विरोधात जनाधार आहे. त्यानुसार शहरी भागातही तो निश्चित होईल असा विश्वास व्यक्त करत पिंपरी-चिंचवड मध्ये जो विकास झाला आहे तो फक्त आणि फक्त राष्ट्रवादीमुळेच झाला आहे हे नागरिकांना पटवून द्या असे रविवारी (दि.15) पिंपरी-चिंचवड पदाधिकार्‍यांना शरद पवार यांनी सांगितले. तसेच पालिकेतील चुकीच्या कामांना विरोध करा आणि चांगल्या कामांना पुढे घेऊन जा असा कानमंत्र दिला. हा कानमंत्र बरोबर घेतल्यामुळे शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये अनेक नवोदित नगरसेवक, नगरसेविकासह जुने नगरसदस्य ही आक्रमकपणे आपली भूमिका मांडली.

 

Tags : pimpri, pimpri news, pimpri chinchwad municipal corporation, Corporators, Sharad Pawar,