Fri, Apr 26, 2019 17:20होमपेज › Pune › सरकार समाजात कटुता निर्माण करीत आहे : शरद पवार 

सरकार समाजात कटुता निर्माण करीत आहे : शरद पवार 

Published On: Aug 05 2018 1:31AM | Last Updated: Aug 05 2018 12:45AMपुणे : प्रतिनिधी

राज्यात आरक्षणाची मागणी करणार्‍या घटकाला बाजूला करून, इतर सर्व घटकांना एकत्र करण्याच्या प्रयत्न केला जात आहे. राज्यघटनेतील इतर घटकांच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतचा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकार तयार नाही. राज्यात शांतता आणि सामंजस्य प्रस्थापित करण्याची भूमिका न घेता सरकारकडून समाजात कटुता निर्माण करण्याचे काम सुरू आहे. याखेरीज, आंदोलकांना एकटे पाडून आणि इतरांना संघटित करून राजकीय फायदा उचलण्यात येत असल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली.

संजय आवटे लिखित ‘वी द चेंज-आम्ही भारताचे लोक’ या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. या वेळी ते बोलत होते. टिळकवाड्यातील लोकमान्य सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे खासदार राजीव सातव, लोकभारतीचे आमदार कपिल पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रझिया पटेल, अर्चना संजय आदी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, एका अभ्यासानुसार राज्यात 100 आत्महत्या झाल्यास, त्यातील 46 आत्महत्या या कुणबी मराठा समाजातील आहेत. ते अल्पभूधारक आहेत. आर्थिक परिस्थिती नसल्याने अर्ध्यावर उच्च शिक्षण सोडण्याचे प्रमाणही या समाजात 42 टक्के आहे. त्यामुळेच या घटकांच्या ज्या शैक्षणिक मागण्या आहेत. त्याही शासनाने पूर्ण केल्या पाहिजेत. आणीबाणीच्या कालखंडाप्रमाणेच आज देशात सर्वत्र अस्वस्थता आहे. 

2024 च्या निवडणुकीची भीती वाटते 

काँग्रेस सत्तेत आल्यावर त्यांच्याशी भांडता येईल. त्यांनी सत्तेचा अतिरेक केला, तर त्यांना सत्तेवरून खालीही खेचता येईल. मात्र सद्य:स्थितीत जे सत्तेवर आहेत. ते कायम राहिल्यास सन 2024 ला निवडणूकच होईल, की नाही शंका वाटते. देशात गेल्या चार वर्षांपासून भुल भुलैय्या सुरू झाला आहे. जी आणीबाणी निर्माण झाली आहे. अशी आणाबाणी कधी अनुभवली नव्हती. धर्मात भांडणे लावून, माथी भडकावली जात आहेत. त्यामुळे इतराप्रमाणेच मीही अस्वस्थ असल्याची भीती खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.