Thu, Jun 20, 2019 21:23होमपेज › Pune › शनिवारवाडा ठरणार राजकीय नांदी?

शनिवारवाडा ठरणार राजकीय नांदी?

Published On: Jan 16 2018 2:15AM | Last Updated: Jan 16 2018 12:37AM

बुकमार्क करा
महापालिकेतून : नेहा सराफ 

 एकेकाळी शनिवारवाड्यातून पुण्यनगरीची सूत्रे हलत असत. महापालिका अस्तित्वात आल्यावर शहराची सूत्रे तिथून हलायला लागली. त्यानंतर गेली अनेक वर्षेे शनिवारवाड्यावर राजकीय कार्यक्रम होणे ही नित्याची बाब आहे. अनेक रथी-महारथींनी शनिवारवाड्याचे व्यासपीठ गाजवले आहे; मात्र गेले काही दिवस शनिवारवाड्यावर होणार्‍या राजकीय आणि अर्थात खासगी कार्यक्रमांवर महापालिका बंदी आणणार असल्याचे समजते. महापालिका प्रशासनाचा हा निर्णय म्हणजे ‘देर आए दुरुस्त आए’ असा आहे; मात्र हा निर्णय असा अचानक आणि कोणत्या कारणाने घेतला गेला याचे उत्तर मिळणे गरजेचे आहे. 

शनिवारवाड्यावर महापालिका निवडणूक काळात अनेक सभा झाल्या. अगदी अलीकडेच काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी आंदोलनानंतरची सभा शनिवारवाडा येथे संपन्न झाली. त्यावेळी मात्र प्रशासनाला तिथे खासगी किंवा राजकीय कार्यक्रम होत नाहीत हे आठवले नाही. मग आताच हे कसे आठवले याचेही उत्तर मिळणे गरजेचे आहे. जर अशा प्रकारचा नियम पूर्वीपासून अस्तित्वात होता मग त्याची अंमलबजावणी करण्याकरिता इतका उशीर होण्याचे कारणही पुणेकरांना समजायला हवे. ऐतिहासिक वास्तूमध्ये खासगी कार्यक्रम करणे चुकीचेच आहे. पण, सांस्कृतिक कार्यक्रम करणेही कितपत योग्य आहे? इथे राजकीय वक्तव्य करून वास्तूचा अपमान होतो असा मतप्रवाह असेल तर बीभत्स आणि कोणतेही सांस्कृतिक दर्शन नसणारे नृत्याचे कार्यक्रम करून कोणतीही परंपरा जोपासली जात नाही हेदेखील लक्षात घ्यायला पाहिजे. शनिवारवाड्यावर कार्यक्रम घेऊन अनेकदा वाहतुकीचा प्रश्‍नही निर्माण होतो. त्या भागात एका क्षमतेच्या पलीकडे गाड्या पार्क करण्यासाठी जागा नसल्याने नदीपात्रातही वाहतूक कोंडी होते. समोरचे वगळता कोणतेही स्वच्छतागृह नसल्याने अनेकांची कुचंबणा होते. त्यातच बाजीराव मस्तानी चित्रपटानंतर वाडा बघण्यासाठी दिवसेंदिवस पर्यटक संख्येत वाढच होत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून महापालिका प्रशासन खासगी कार्यक्रम रोखण्याचा विचार करत असेल तर अत्यंत योग्य आहे; मात्र ही कृती कोणतीही घटना घडण्यापूर्वी घडली असती तर अधिक योग्य ठरली असती. आता या विषयावरून सत्ताधार्‍यांना विरोधकांनी घेरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे शनिवारवाडा आता नव्या राजकीय वादविवादाची नांदी ठरण्याची चिन्हे आहेत.