Tue, Jun 18, 2019 22:18होमपेज › Pune › शनिवारवाडा कुणाचा?

शनिवारवाडा कुणाचा?

Published On: Jan 20 2018 1:41AM | Last Updated: Jan 20 2018 1:41AMपुणे ः प्रतिनिधी

शनिवारवाड्यासमोरील प्रांगणात यापुढे महापालिकेचे आणि शासनाचे कार्यक्रम सोडून इतर कोणतेही कार्यक्रम घेता येणार नाहीत, असे प्रसिद्धीपत्र महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी काढल्याने खळबळ उडाली आहे. आयुक्तांच्या प्रसिद्धीपत्रावर टीका होत आहे. या पार्श्‍वभूमीवर शनिवारवाड्यावरील कार्यक्रमासंबंधीचा निर्णय घेण्याचा अधिकार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचा आहे. या विषयावर सर्वसाधारण सभेत निर्णय होईपर्यंत आयुक्तांच्या आदेशाला स्थगिती देण्यात येत आहे, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली आहे.

ऐतिहासिक वारसा असलेल्या शनिवारवाड्यावर राजकीय कार्यक्रमांना यापूर्वीच बंदी अली आहे. मात्र सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली याठिकाणी सर्रास राजकीय कार्यक्रम घेतले जातात. शनिवारवाड्यावर 31 डिसेंबर रोजी कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या द्विशताब्दीनिमित्त ‘एल्गार परिषद’ घेण्यात आली होती. ही परिषद परवानगी देण्यापासूनच चर्चेत राहिली होती. गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयू छात्र संघटनेचा उमर खलिद यांनी या परिषदेत केलेल्या भाषणावरून वादंग निर्माण झाला होता. या वादाच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारवाड्यावर महापालिका आणि शासकीय कार्यक्रम सोडून इतर कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही, असे पत्र आयुक्तांनी काढले. त्यासंबंधीची जाहीरातही पालिका प्रशासनाकडून जाहीर प्रसारित करण्यात आली. 

आयुक्तांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानंतर त्यांच्या निर्णयावर अनेकांकडून टिका झाली. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून शनिवार वाडा प्रांगणाचे महत्व वाढण्यास मदत झाली आहे. आयुक्तांच्या प्रसिद्धीपत्रामुळे या ठिकाणी होणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमांवर टाच येणार आहे. यासंदर्भात महापौरांनी आयुक्तांच्या निर्णयास विरोध करत हा निर्णय घेण्याच अधिकार पालिकेच्या सर्वसाधारण सभेस आहे. त्यामुळे या विषयावर सर्वसाधारण सभेत जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत आयुक्तांच्या आदेशाला तहकुबी देण्यात येणार आहे. यासंबंधीच पत्र त्वरित आयुक्तांना दिले जाणार आहे. 

दरम्यान, शनिवारवाड्यावर होणार्‍या कार्यक्रमांमुले परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण होतो. याशिवाय शनिवारवाड्याच्या सुरक्षेला धोका असल्याचा अहवाल पोलिसांनी पालिका प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.