Fri, Mar 22, 2019 01:35
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › तो आला, त्याने पाहिलं, आणि त्याने जिंकल

तो आला, त्याने पाहिलं, आणि त्याने जिंकल

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 16 2018 1:17AMपुणे : प्रतिनिधी

सायंकाळचा सुमार..., शनिवारवाडा महोत्सवाचे निमित्त..., सुजु कारमधून मारलेली धडाकेबाज एन्ट्री.., तुटक्या-मुटक्या मराठी भाषेत सर्वसामान्यांशी साधलेला संवाद आणि मारलेल्या दिलखुलास गप्पा, अशा उत्साहाच्या वातावरणात तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने सर्वसामान्यांची मने जिंकली.

शनिवारवाडा महोत्सव समितीकडून शनिवारवाडा डान्स व म्युझिक फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याची माहिती देण्यासाठी ज्येष्ठ अभिनेता जॉकी श्रॉफ पुण्यात आला होता. यावेळी पत्रकार परिषदेत महोत्सव समितीच्या अध्यक्षा सबीना संघवी, गायत्रीदेवी पटवर्धन, वर्षा चोरडीया उपस्थित होत्या. येत्या 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वा. शनिवारवाडा येथे होणार आहे. पवित्र भट व सहकारी यांचा ‘श्रीरंगा द रिक्लाइनिंग लॉर्ड’ हा कार्यक्रम आणि नक्षत्र गुरुकुलाने सादर केलेले गोतिपुआ नृत्य हे या महोत्सवाचे यंदाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

यावेळी संघवी म्हणाल्या, शनिवारवाडा नृत्य आणि संगीत महोत्सवाच्या या कार्यक्रमाच्या प्रवेशिका बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, टिळक स्मारक मंदिर, डीव्हीडी एक्सप्रेस-औंध आणि दि ओ हॉटेल-कोरेगांव पार्क येथे 16 ते 24 फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध असतील. तसेच कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी 11.00 वाजल्यापासून कार्यक्रमस्थळी प्रवेशिका उपलब्ध असतील.

काम नही तो फार्म

पत्रकार परिषदेनंतर अभिनेता जॉकी श्रॉफ यांनी पत्रकारांशी औपचारिक संवाद साधला. पत्रकार भवनच्या कँटीनमधील पुणेरी वडापावचा आस्वाद घेत जॅकीदादाने खुमासदार गप्पांचा पाऊस पाडला. दैनंदिन कामांचे नियोजन कशाप्रकारे असते असे विचारले असता, काम नही तो फार्म असे त्याने उत्तर दिले. तसेच फार्म हाऊसवर स्वत:करत असलेल्या बटाट्याच्या शेतीसंदर्भात सुद्धा त्याने माहिती दिली.

भिडू हात मिळवं...

पत्रकार परिषदेनंतर जॅकी श्रॉफ यांनी प्रत्येकाशी तुटक्या -मुटक्या मराठीत संवाद साधत प्रत्येकाची मने जिंकली. तसेच गाडीत बसून जात असताना एका गांधी टोपी घातलेल्या आजोबांना आवाज देत ‘भिडू हात मिळवं’ असे म्हणत आजोबांशी हात मिळविला. त्यानंतर आजोबांचा आनंद गगनात मावेनासा झालेला पहायला मिळाला.