होमपेज › Pune › शनिवारवाडा दत्तक देणे आहे!

शनिवारवाडा दत्तक देणे आहे!

Published On: May 03 2018 1:31AM | Last Updated: May 03 2018 1:07AMपुणे : प्रतिनिधी 

केंद्र सरकारच्या अडॉप्ट अ हेरिटेज म्हणजेच पुरातन वास्तू दत्तक योजनेतून लाल किल्ल्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील 12 ठिकाणांसाठी स्वारस्य प्रस्ताव मागविण्याची योजना केंद्र सरकारच्या रडारवर आहे. त्यातील प्रस्तावित तीन टप्प्यातील योजनेत, पहिल्या टप्प्यात अजिंठा गुंफा, दुसर्‍या टप्प्यात मुंबईतील घारापुरी लेणी (एलिफंटा गुंफा), कुलाबा किल्ला, ससून डॉक; तर तिसर्‍या टप्प्यात वेरूळच्या लेणी दत्तक दिल्या जाणार आहेत. याशिवाय पुण्यातील शनिवार वाडा, आगाखान पॅलेस व कार्ला, भाजा, लेण्याद्री येथील लेण्या तसेच औरंगाबादमधील बिवी का मकबरा, देवगिरी किल्ला आणि मुंबईतील कान्हेरी गुफा ही पर्यटनस्थळे या योजनेच्या सूचित नंतरच्या टप्प्यात समाविष्ट करण्यासाठी अधोरेखित करण्यात आली आहेत. 

राष्ट्रपतींनी 2017 मध्ये जागतिक पर्यटनदिनी केंद्र सरकारच्या या योजनेची घोषणा केली होती. ज्या कंपन्या देशातील कोणत्याही स्मारकांच्या सेवेसाठी  योगदान देऊ इच्छितात त्यांना पुढे येण्याचे आवाहन केले गेले होते. त्यानुसार, या योजनेअंतर्गत तब्बल 25 कोटींमध्ये दालमिया उद्योग समूहाने युनेस्कोचा जागतिक वारसा लाभलेला लाल किल्ला संवर्धनासाठी दत्तक घेतला आहे. यावर विरोधकांसह अनेक सामाजिक संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे. पुरातत्त्व वास्तू खासगी कंपन्यांना आंदण देऊन सरकारला नेमके काय साध्य करायचे आहे? असा सवाल उपस्थित केला जात असतानाच केंद्र सरकारने अडॉप्ट अ हेरिटेज योजनेच्या  अधिकृत वेबसाईटवर देशभरातील दत्तक द्यावयाच्या अनेक ठिकाणांची यादी जाहीर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लक्ष घालून ही खासगीकरणाची योजना मार्गी लावल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अ‍ॅ़डॉप्ट हेरिटेज प्रोजेक्ट अंतर्गत 90हून अधिक ऐतिहासिक वास्तू दत्तक घेण्यासाठी उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील आठ वास्तूंसह ताजमहाल, राजस्थानमधील चित्तोड गड किल्ला, मेहरौली आर्चिऑलॉजीकल पार्क, दिल्लीतील गोल गुंबद, बदामी धारवाडचे शिल्प समूह, हम्पी, पट्टकल अशा देशभरातील प्रमुख ठिकाणांचा खासगीकरणाच्या या दत्तक योजनेत समावेश करण्यात आला आहे. या महत्त्वाच्या स्मारकांची देखभाल, विकास अशी कामे खासगी कंपन्यांच्या हाती सोपवण्यात येणार आहे.  आतापर्यंत झालेले दत्तक करार, लाल किल्ला - दालमिया भारत , गोवलकोंडा किल्ला, हैदराबाद - दालमिया भारत , कांगरी ट्रेक रूट, लडाख - एडव्हेन्चर टूर ऑपरेटर, गंगोत्री, गोमुख, उत्तराखंड  - एडव्हेन्चर टूर ऑपरेटर , कर्नाटक, गोव्यातील पर्यटनस्थळे, हम्पी, कर्नाटक , गोल गुम्बज, बिजापूर  ओल्ड गोवा चर्चा, अगुडा तुरुंग, बासीलीका जिझस.

Tags : Pune, Shaniwar Wada, adopted