Sun, Jan 20, 2019 10:32होमपेज › Pune › मदरशात दोन मुलांवर लैंगिक अत्याचार

मदरशात दोन मुलांवर लैंगिक अत्याचार

Published On: Jul 28 2018 1:39AM | Last Updated: Jul 28 2018 1:25AMपुणे : प्रतिनिधी 

धार्मिक शिक्षण घेण्यासाठी मदरशामध्ये शिकत असलेल्या दोन मुलांवर मौलानानेच लैंगिक अत्याचार केल्याची घृणास्पद घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार कात्रज येथील एका मदरशात घडला आहे. पीडित चिमुरड्यांनी याबाबत एका सामाजिक संस्थेकडे ही बाब उघड केल्याने ही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मदरशात एकूण 30 मुले होती. त्यातील किती मुलांवर मौलानाने अत्याचार केला याचा तपास पोलिस करीत आहेत. ही सर्व मुले अनाथ असून ती पर राज्यातील असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मौलानाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मौलाना रहीम (पूर्ण नाव व पत्ता नाही), असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. बालहक्क कार्यकर्त्या डॉ. यामिनी अद्वैत अडबे (54) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. 

मौलाना रहीम हा मदरशातील मुलांना धार्मिक शिक्षण देतो. रहीम हा मुळचा बिहार येथील आहे. रात्रीच्या वेळी तो तेथील चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करीत असल्याने त्याच्या या कृत्याला घाबरून 10 वषार्र्ंची दोन मुले 23 जुलै रोजी मदरशातून पळून पुणे स्टेशन येथे आली होती. स्टेशनवरील पोलिसांना ही मुले संशयास्पदरित्या फिरताना दिसून आली. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, मदरशातून पळून आल्याचे त्यांनी कबुल केले. त्यामुळे त्यांना साथी संस्थेकडे देण्यात आले होते. डॉ. यामिनी अडबे यांना हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांची विश्वासात घेऊन चौकशी केली. त्यावेळी दोन्ही मुलांवर मौलाना रहीम हा रात्रीच्या वेळी लैंगिक अत्याचार करत असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न होत आहे. त्याला विरोध केल्यास तो शिवीगाळ करून काठीने मारहाण करीत असल्याने  घाबरून आम्ही पळून आलो असल्याचे मुलांकडे केलेल्या चौकशीत समोर आले आहे. 

पोलिस आयुक्‍तांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल 

हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर डॉ. यामिनी अडबे यांनी पोलिस आयुक्तालयात रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. त्यांच्या आदेशानुसार त्वरित गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार रात्री उशीरा भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.