Sun, Mar 24, 2019 10:26होमपेज › Pune › बालकावर महंताचेच लैंगिक अत्याचार 

बालकावर महंताचेच लैंगिक अत्याचार 

Published On: Apr 08 2018 2:15AM | Last Updated: Apr 08 2018 1:16AMपुणे : पुष्कराज दांडेकर

वाराणसीतील बालसुधारगृहात ठेवलेल्या बालकावर तेथील महंतानेच लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर पीडिताने भयभीत अवस्थेत पुणे गाठले. पुण्यात पुन्हा स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने बालसुधारगृहात रवनागी झाल्यानंतर त्याच्यावरील अत्याचाराला वाचा फुटली अन् वाराणसीतील महंतावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडित बालकाच्या आई-वडिलांनी लहान असतानाच त्याला सोडून दिले होते. त्यामुळे आई-वडीलांबद्दल त्याला जास्त माहिती नाही. सांभाळ करायला कोणीही नसल्याने त्याच्या नशीबी  भटकणे आले. त्यामुळे  त्याला वाराणसी येथील ए. आर. राम. बालाश्रम येथे ठेवण्यात आले होते. परंतु 27 मार्च रोजी तेथील  महंताने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले व कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. यामुळे भयभीत झालेल्या बालकाने पुन्हा आपल्यावर असा प्रसंग ओढवू नये आणि जिवाच्या भीतीने  बालकाश्रमातून पलायन केले. त्यानंतर वेगवेगळ्या शहरांमधून तो पुण्यात आला. 

रस्त्याने भटकत असतानाच पुण्यातील एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्याने त्याला पाहिले आणि त्या कार्यकर्त्यांनी त्याला शिवाजीनगर येथील बालसुधारगृहात 31 मार्च रोजी दाखल केले. बालसुधारगृहातील कर्मचार्‍यांनी त्याच्याकडे विचारपूस केली तेव्हा या अत्याचाराचा प्रकार पुढे आला.  बालसुधारगृहातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी तात्काळ शिवाजीनगर पोलिसांना पाचारण करून त्याचा जबाब घेतला. आता महंताविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करून तो वाराणसीला वर्ग केला आहे.

दरम्यान मुलाचे आई वडील, त्याचे नातेवाईक  यांची त्याला काहीच माहिती नाही. तसेच महंत म्हणजे नेमका तेथील कर्मचारी किंवा कोण हेही अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे पुढील तपासासाठी हे प्रकरण पाठविले असल्याचे  पोलिस उपनिरीक्षक शिंदे यांनी सांगितले.