Fri, Aug 23, 2019 14:28होमपेज › Pune › नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांकडून लैंगिक अत्याचार  

नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांकडून लैंगिक अत्याचार  

Published On: Apr 17 2018 1:52AM | Last Updated: Apr 17 2018 1:46AMपुष्कराज दांडेकर 

पुणे :  शहरात मागील सहा वर्षांत झालेल्या अत्याचारांपैकी बहुतेकवेळा नातेवाईक, ओळखीच्या वासनांध व्यक्तींकडूनच मुलांवर लैंगिक अत्याचार होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. दर दिवसाला वाढणार्‍या या घटनांमुळे पालकांमध्ये तर चिंतेचे वातावरण आहेच. या  विकृतीला आळा घालण्यासाठी सामाजिक स्तरावर मोठे प्रयत्न करणे गरजेचे आहे. 
शहरात  बाललैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता या घटनांमध्ये अत्याचार करणारे हे 17 ते 60 वयोगटातील आहेत. आप्तेष्ट, नातेवाईक, कुटुंबाचे मित्र, शिक्षक या लोकांकडून मुलांवर लैंगिक अत्याचार झाले आहेत.  त्यामुळे आपली मुले घर, शाळा, शिकवण्या, आसपासच्या परिसरात सुरक्षित आहेत का? याचा प्रश्‍न पडणे स्वाभाविक आहे. त्यामुळे पालकांनीही याबाबत सजग राहण्याची आवश्यकता आहे. 

मागील सहा वर्षांत दोन हजार मुले लैंगिक अत्याचाराला बळी पडले आहेत. यासंदर्भात शहरात दोन हजारांपेक्षाही अधिक गुन्हे बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल आहेत. 

2012 मध्ये बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यामध्ये अमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. नोव्हेंबर 2012मध्ये बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा लागू करण्यात आला आहे. मात्र या कायद्याबद्दल अद्यापही लोकांना पुरेशी माहिती नसल्यामुळे अशा घटना घडूनही अनेक जण तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. का घडतात घटना नोकरीनिमित्त पालक बाहेर असल्याने  शहरात मोठ्या प्रमाणात राज्यातील अनेक जिल्ह्यांतून, परराज्यातून स्थलांतरित होऊन लोक येत आहेत. त्यामुळे काही वेळा अगदी हाऊसकिपिंगचे काम करणार्‍यांपासून ते आयटी कंपनीत काम करणारे दाम्पत्यापर्यंत दोघेही कामावर जातात. त्यामुळे मुले शाळेतून आल्यावर घरी एकटीच असतात किंवा त्यांना आपल्या शेजारच्या लोकांजवळ ठेवले जाते. पालकांचा वेळ मुलांना मिळत नाही. याचाच गैरफायदा काही वेळा हे शेजारी, मित्र, नातेवाईक घेतात आणि बालकांवर अत्याचार करतात. 

मुलांना धमकी देऊन अत्याचार 

काही वेळा मुलांना धमकी देऊन त्यांच्यावर अत्याचार केले जातात. त्यामुळे मुले घाबरून त्यांच्या पालकांना या घटनांबाबत सांगत नाहीत. काही दिवसांनी हा प्रकार लक्षात आल्यावर मात्र पालकांचे डोळे उघडतात. 

पॉर्नोग्राफीचा परिणाम 

बालकांवर अत्याचार करणार्‍यांमध्ये 17 ते 40 वयाच्या लोकांचा जास्त सहभाग दिसून येतो. मात्र यात अल्पवयीन मुलांनीच त्यांच्या शेजारील अल्पवयीन मुलांवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून काही गोष्टी सहजतेने उपलब्ध होत आहेत. त्यामुळे आपली मुले इंटरनेटवर तासनतास नेमके काय करतात याकडे पालकांचे लक्ष नसते. मुलांना पॉर्नोग्राफी सहज उलब्ध होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये असलेली लैंगिकतेबाबतचे अज्ञात त्यांना अशा गोष्टी करण्यास भाग पाडते.