Sun, Aug 25, 2019 19:48होमपेज › Pune › सेक्स रॅकेटचा पर्दाफाश 

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश 

Published On: Jun 28 2018 1:34AM | Last Updated: Jun 28 2018 1:20AMपुणे : प्रतिनिधी 

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवार पेठ येथील फ्लॅटमध्ये चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत कर्नाटक राज्यातील व बांग्लादेशातील  दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली, तर त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेणार्‍या तिघांना अटक केली. चंदा मुईमांग तमांग, संजिदा रुहूल अमीन मुल्ला (25, मूळगाव प. बंगाल), कुमार शेलवन तमांग (27, काठमांडू नेपाळ) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांच्यासह रुपा तमांग, आलम हक  (बांग्लादेश), शांती (प. बंगाल) व एक अनोळखी ग्राहक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार पेठ येथील डायमंड इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये रूपा तमांग व चंदा तमांग या महिला अल्पवयीन मुलींना डांबून ठेवून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस नाईक नितीन तरटे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकून कारवाई केली. या मुलींकडून  जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेणार्‍या चंदा तमांग, संजिदा रुहुल अमीन मुल्ला, कुमार शेलवन तमांग या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख 1 हजार 500 रुपये, एक मोबाइल, लाईटबिल, आधार कार्ड जप्त केले आहेत. अल्पवयीन मुलींची रवानगी महंमदवाडी येथील रेस्क्यू होममध्ये  केली, तर इतर एका अनोळखी ग्राहकासह चार जण व ताब्यात घेतलेले तीन अशा सात जणांवर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुटका केलेल्या बांग्लादेशी मुलीला तिच्या बहिणीच्या नवर्‍याने कोलकाता येथे आणले. त्यानंतर तिला तेथून एक एजंट पुण्यात घेऊन आला व वेश्याव्यवसायात ढकलले, ही कारवाई पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील, सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव, कर्मचारी नितीन तरटे, नितीन लोंढे, गीतांजली जाधव, कविता नलावडे, अनुराधा ठोंबरे, रूपाली चांदगुडे व इतर कर्मचारी यांच्या पथकाने केली.