Wed, Jun 26, 2019 11:25होमपेज › Pune › सत्तर टक्के माता पोषक आहारापासून वंचित

सत्तर टक्के माता पोषक आहारापासून वंचित

Published On: Sep 11 2018 1:40AM | Last Updated: Sep 11 2018 12:43AMपुणे ः प्रतिनिधी

प्रसूती झालेल्या माता शारीरिकदृष्ट्या अशक्‍त झालेल्या असतात. अशक्‍तपणा घालविण्यासाठी तिला पुरेशा प्रमाणात पोषक आहार घेणे गरजेचे आहे. पण जीवनशैलीतील बदल, नोकरी आणि जागृतीचा अभाव यामुळे त्यांच्याकडून पुरेसा पोषण आहार घेतला जात नाही. याचाच बाळाच्या वाढीवर, पोषणावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे परिणाम होत आहे. त्यामुळे या मातांनी पोषण आहार घेणे आवश्यक असल्याचे मत आहारतज्ज्ञ व्यक्‍त करतात.

दरवर्षी 1 ते 7 सप्टेंबर हा जागतिक पोषण आहार सप्ताह म्हण्ाून साजरा केला जातो. यानिमित्‍ताने आहारतज्ज्ञांनी हे निरीक्षण व्यक्‍त केले आहे. स्तनपान करण्याच्या पूर्ण 6 महिन्यांच्या काळात उत्तम आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. म्हणून नवमातांनी कॅलरी, प्रथिने, जीवनसत्वे आणि क्षार यांचा समावेश असलेला आहार घ्यावा, अशी माहिती आहारतज्ज्ञ डॉ. अल्का भारती यांनी दिली. 

डॉ. भारती म्हणाल्या, बहुतेक नवमाता प्रसूतीच्या 2 महिन्यांनंतर पोषक आहार घेण्याकडे दुर्लक्ष करतात. त्याला कारण म्हणजे छोटे कुटुंब असल्यामुळे घरची जबाबदारी सांभाळताना स्वत:कडे दुर्लक्ष केले जाते. तर काही महिला या नोकरदार असतात. परंतु, काही सोपी पथ्थे पाळल्याने तुमचे व्यावसायिक, व्यक्तिगत आयुष्याशी तडजाड न करता पोषक आहार घेणे शक्य असल्याचेही भारती यांनी व्यक्त केले.

नवमातांनी असे करावे आहाराचे नियोजन

आहाराची दिनचर्या आखून घ्या. 
दिवसातून 5-6 वेळा आहार घ्या.
आहारात प्रथिने, हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्ये आणि पुरेसे पाणी यांचा समावेश असावा.
सुका मेवा, एनर्जी बार, फळे इत्यादी जिन्नस जवळ बाळगा.
तेलकट आणि मसालेदार पदार्थ, अतिप्रमाणात चहा व कॉफी पिणे टाळा.
नवमातांनी वजन कमी करण्यासाठी योगासने करावी

नवमातांना प्रसूतीनंतर लगेचच वजन कमी करायचे असेल तर स्निग्ध पदार्थांचे प्रमाण कमी असलेला आहार घेणे आवश्यक आहे. तसेच ताज्या भाज्या, फळे आणि प्रथिने व कर्बोदके संतुलित आहार घ्यावा. व्यायाम आणि योगासनांमुळे कॅलरीज कमी करता येतात आणि स्नायू व हाता-पायांना बळकटी प्राप्त होते, असे आहार तज्ज्ञांचे मत आहे.