Tue, Jun 25, 2019 13:08होमपेज › Pune › यंदाच्या 'पिफ'मध्ये सात मराठी चित्रपटांची वर्णी

यंदाच्या 'पिफ'मध्ये सात मराठी चित्रपटांची वर्णी

Published On: Jan 05 2018 7:35PM | Last Updated: Jan 05 2018 7:23PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा (पिफ)मध्ये मराठी चित्रपटांच्या स्पर्धा विभागात यंदा सात चित्रपटांची वर्णी लागली आहे. पुणे फिल्म फाऊंडेशन आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा ११ ते १८ जानेवारी या कालावधीत हा महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवामध्ये दाखविले जाणारे चित्रपट आणि त्याकरिता असणारे परिक्षक यांची नावे महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी  पत्रकार परिषदेत जाहीर केली.

यावेळी ज्येष्ठ चित्रपट समीक्षक व महोत्सवाचे उपाध्यक्ष समर नखाते, निवड समिती सदस्य अभिजीत रणदिवे, निवड समिती सदस्य मकरंद साठे, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय)चे संचालक भूपेंद्र थोला  उपस्थित होते. विविध समस्यांसोबतच हलके-फुलके विषय समर्थपणे मांडणाऱ्या सात मराठी चित्रपटांची या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत. मराठी स्पर्धात्मक विभागात 'मुरांबा', 'फास्टर फेणे', 'कच्चा लिंबू' या प्रदर्शित झालेल्या चित्रपटांबरोबरच 'पिंपळ', 'झिपर्‍या', 'नशीबवान' आणि 'म्होरक्या' या प्रदर्शित न झालेल्या चित्रपटांचा समावेश आहे. 

डॉ. जब्बार पटेल म्हणाले, दर्जेदार चित्रपट पाहण्याबरोबरच ‘पिफ’मध्ये रसिक व अभ्यासकांसाठी ‘पिफ फोरम’ हा खास उपक्रम राबवण्यात येणार आहे. चित्रपटांशी संबंधित मान्यवर व्यक्तींची व्याख्याने, परिसंवाद, कार्यशाळा आणि चर्चासत्रांमधून चित्रपटांच्या विविध अंगांची माहिती या उपक्रमाद्वारे मिळेल.  हे ‘पिफ फोरम’ महोत्सवाच्या प्रमुख चित्रपटगृहाच्या आवारात उभारण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईतील आर. के. स्टुडिओला काही महिन्यांपूर्वी लागलेल्या आगीच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षी ‘पिफ’मध्ये ‘राज कपूर रेट्रोस्पेक्टिव्ह’ हा विशेष विभाग ठेवण्यात आला आहे. यामध्ये 'बॉबी' या हिंदी चित्रपटासोबत 'मेरा नाम जोकर', 'संगम', 'श्री ४२०' आणि 'आग' हे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. अलिकडेच काही ज्येष्ठ कलाकारांचे निधन झाले, त्याच्या स्मृतीस अभिवादन म्हणून 'मेरा गाव मेरा देश' (विनोद खन्ना), 'मैंने प्यार किया' (रीमा लागू), 'न्यू दिल्ली टाईम्स' (शशी कपूर), 'कभी हां कभी ना' (दिग्दर्शक कुंदन शहा) आणि 'आर पार' (अभिनेत्री श्यामा) हे चित्रपटसुद्धा रसिकांना पाहायला मिळणार आहेत.

याशिवाय स्त्रियांच्या समर्थ भूमिका असणारे 'तीन कन्या' (सत्यजीत रे), 'शंकराभरणम' (के. विश्‍वनाथ), 'गेज्जे पूजे' (पुतन्ना कनगल), 'परिणिता' (बिमल रॉय), 'अवरगल' (के. बालचंदर) या चित्रपटांचाही समावेश करण्यात आला आहे. महोत्सवात दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांच्या परीक्षणासाठी जगभरातून आठ चित्रपट तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये दिग्दर्शिका जोआना कोस्क्राऊझ (पोलंड), दिग्दर्शक व एफटीआयआय माजी विद्यार्थी विमुक्थी जयासुंदरा (श्रीलंका), दिग्दर्शक रॉड्रिगो प्ला (मेक्सिको), दिग्दर्शक मॅथ्यू डेनिस (कॅनडा), दिग्दर्शक मॉरिझिओ निकेती (इटली), इराणी अभिनेत्री गेलारेह अब्बासी, हिंदी चित्रपट लेखक कमलेश पांडेय, मल्याळम चित्रपटांचे दिग्दर्शक बिजूकुमार दामोदरन (डॉ. बिजू) यांचा समावेश आहे.