होमपेज › Pune › सेट परीक्षेलादेखील आता दोनच पेपर

सेट परीक्षेलादेखील आता दोनच पेपर

Published On: Sep 04 2018 1:18AM | Last Updated: Sep 04 2018 12:58AMपुणे : प्रतिनिधी 

वरिष्ठ महाविद्यालयाच्या सहायक प्राध्यापक पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नेट ही परीक्षा आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत घेण्यात येणार असून, पहिल्यांदाच ऑनलाईन होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत महाराष्ट्र आणि गोवा राज्यात घेण्यात येणार्‍या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षेचे स्वरूप बदलले असून, आता दोन पेपर घेण्यात येणार आहेत. मात्र परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या सेट विभागाचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस यांनी दिली आहे.

वरिष्ठ महाविद्यालयाच्या सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात 35 व्या वेळी घेण्यात येणार आहे, मात्र पहिल्यांदाच या परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. 

या बदललेल्या स्वरूपाविषयी माहिती देताना डॉ. कापडणीस म्हणाले, यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सेट परीक्षा घेण्यात येते. त्यामुळे नेट परीक्षेत झालेल्या बदलांमुळे सेट परीक्षेत बदल करणे भागच आहे. त्यानुसार सेट परीक्षेच्या तीन पेपरचे रूपांतर दोन पेपरमध्ये करण्यात आले आहे. त्यानुसार पहिला पेपर 100 गुण तर दुसरा पेपर 200 गुण असे एकूण 300 गुणांसाठी एकाच दिवशी तीन तास ही परीक्षा घेण्यात येणार असून, ती परंपरागत पद्धतीने होणार आहे. प्रश्‍नांच्या स्वरूपात बदल करण्यात आला असून, पहिल्या पेपरसाठी 60 ऐवजी 50 प्रश्‍न ठेवण्यात आले आहेत. हे सर्व प्रश्‍न  सोडविणे बंधनकारक आहे, तर दुसरा पेपर हा पेपर दोन आणि पेपर तीन मिळून एकत्र काढण्यात येणार आहे. या पेपरमध्ये 100 प्रश्‍न ठेवण्यात आले आहेत.

अर्ज भरण्यासाठी आधारकार्ड अनिवार्य

परीक्षेसाठीचा ऑनलाईन अर्ज आधारकार्डला लिंक करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड असणे अनिवार्य आहे. पूर्वी परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना ग्रीव्हियन्स दाखल करता येत होते. आता मात्र निकालानंतर विद्यार्थ्यांना  ग्रीव्हियन्स दाखल करता येणार नाही. निकालाच्या स्वरूपात बदल करण्यात आला असून दोन्ही पेपर दिलेल्या उपस्थित विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार 6 टक्के पात्र उमेदवार ठरवले जातील. त्यानंतर जे विद्यार्थी दोन्ही पेपर मिळून किमान 40 टक्के (खुला प्रवर्ग) किंवा 35 टक्के (आरक्षित प्रवर्ग) गुण मिळवतील अशा विद्यार्थ्यांची यादी तयार करून सर्वाधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची मेरीट लिस्ट तयार करण्यात येईल व शासनाच्या आरक्षण धोरणानुसार फक्त असिस्टंट प्रोफेसर किंवा ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि असिस्टंट प्रोफेसर या दोन्हींसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे,असे  कापडणीस यांनी सांगितले. 

सेट परीक्षादेखील भविष्यात होणार ऑनलाईन 

आत्ता होणार्‍या ऑनलाईन नेट परीक्षेचा अभ्यास करण्यात येणार आहे. या परीक्षेत येणार्‍या अडचणी किंवा त्रुटींचा विचार करून सेट परीक्षा ऑनलाईन राबविता येईल का याची चाचपणी करण्यात येणार आहे. त्यासाठी परीक्षा झाल्यानंतर सेट विभागातील अधिकारी दिल्ली येथे जाऊन कार्यप्रणाली समजून घेणार आहेत आणि त्यानंतर सेट परीक्षादेखील ऑनलाईन राबविण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे देखील डॉ.कापडणीस यांनी सांगितले आहे.