Sun, May 26, 2019 18:41होमपेज › Pune › सेट, नेट, पीएच.डी.धारक पदव्या परत करणार

सेट, नेट, पीएच.डी.धारक पदव्या परत करणार

Published On: May 04 2018 1:50AM | Last Updated: May 04 2018 1:38AMपुणे : प्रतिनिधी 

राज्यातील प्राचार्य भरतीवरील बंदी राज्य शासनाने उठविली असली तरी सहायक प्राध्यापक भरतीवर असलेले निर्बंध अद्याप कायम आहेत. प्राध्यापक भरतीवर असलेल्या बंदीमुळे राज्यातील सहायक प्राध्यापक पदाच्या हजारो जास्त जागा रिक्त आहेत. पदभरतीच होत नसल्यामुळे सेट/ नेट/ पीएच.डी. अशा उच्च शिक्षित पदवीधारकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळेच या पदव्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला परत करण्याचा इशारा सेट, नेट, पीएच.डी संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी देण्यात आला आहे.

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवून पदभरती करावी, या मागणीसाठी सेट, नेट, पीएच.डी धारक एकत्र आले होते. त्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना निवेदन दिले. या निवेदनामध्ये शासनाने जून 2017 पासून प्राध्यापक भरतीवर अनिश्‍चित काळासाठी बंदी घातली आहे. आज नोकरी मिळेल, उद्या नोकरी मिळेल, या आशेवर आयुष्यातली उमेदीची सात-आठ वर्षे निघून गेली. गावाकडे ‘लई शिकला पण, वाया गेला’ अशी आमची टिंगल करून, आमच्याकडे बोट दाखवून लोक त्यांच्या मुलांची शिक्षणं बंद करत आहेत.

हे शिक्षण व्यवस्थेचे फार मोठे अपयश आहे. त्यामुळे आमचे पोट भरू न शकणार्‍या पदव्या परत घ्याव्यात, सुशिक्षित बेरोजगार म्हणून संस्थाचालकांना नोकरीसाठी लाच म्हणून 25 लक्ष रुपये बिनव्याजी कर्ज द्यावे, विद्यापीठाच्या नावाने चहा आणि वडापावचे ठेले लावण्याची परवानगी मिळावी, 25 हजार रुपयांपर्यंतची चोरी करण्याचे लायसन्स मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव द्यावा, सुशिक्षित बेरोजगार म्हणून हातभट्टी किंवा दारूचे गुत्ते चालविण्याचे परवाने मिळवण्यासाठी शासनाकडे शिफारस करावी अशा उपरोधिक मागण्या केल्या आहेत. 

तरी आमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा. पुढील एक महिन्यामध्ये आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही आमच्या पदव्या विद्यापीठाकडे रीतसर परत करू, असे निवेदनात नमूद केले आहे.