Tue, Mar 19, 2019 09:15होमपेज › Pune › थंडीमुळे मागणी वाढल्याने तिळाच्या दरात वाढ

थंडीमुळे मागणी वाढल्याने तिळाच्या दरात वाढ

Published On: Dec 09 2017 1:45AM | Last Updated: Dec 09 2017 12:22AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

थंडीमुळे वाढलेली मागणी, गेल्या वर्षीच्या तुलनेत घटलेले उत्पादन तसेच आफ्रिकेतून तिळाच्या निर्यातीत झालेली घट आदींमुळे गेल्या पंधरा दिवसांमध्ये तिळाचे दर प्रतिकिलोमागे 20 ते 25 रुपयांनी वधारले आहे. सध्या मार्केटयार्डातील बाजारात कच्चा तिळाच्या प्रतिकिलोस 85 ते 100 रुपये तर स्वच्छ तिळास 110 ते 120 रुपये दर मिळत असल्याची माहिती रमेश पटेली यांनी दिली.  

देशात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये तिळाचे सर्वाधिक उत्पादन घेण्यात येते. गेल्या वर्षी तिळाचे 5 लाख 60 हजार मेट्रिक टन इतके उत्पादन झाले होते. यंदाच्या वर्षी ते 4 लाख 18 हजार मेट्रिक टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. दरम्यान, तीळ निर्यातदारांकडून आफ्रिकेतील सुदान, युगांडा, इथोपिया, टांझानिया आदी ठिकाणाहून तीळ आयात करून त्यावर प्रक्रिया करण्यात येते.

त्यानंतर ते तीळ देशातून मुख्यत्वे अमेरिका, युरोप, अरब राष्ट्रे, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, चीन, कोरिया आदी देशांमध्ये निर्यात करण्यात येतात. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये आफ्रिकेतील तिळाची आवक घटल्याने देशातील तसेच येथून निर्यात करण्यात आलेल्या तिळाच्या दरात वाढ झाली आहे. यंदा आफ्रिकेतील तीळ जानेवारीपर्यंत भारतात पोहोचण्याची शक्यता नसल्याने भारतातील निर्यातदारांना देशातीलच तिळावरच अवलंबून राहावे लागणार आहे.

ज्या ठिकाणाहून बाजारपेठांमध्ये तिळाची आवक होते़, त्याठिकाणी लहरी वातावरणाचा फटका बसल्याने गेल्या दहा ते पंधरा दिवसांत अचानक आवक घटली आहे़  तिळाची भारतातील आवक ऑक्टोंबर महिन्यात सुरू होते़  दरम्यान, याच महिन्यात झालेल्या शीपमेंट संदर्भातील तांत्रिक कारणामुळे आफ्रिकेतून चीनला तिळाची निर्यात करण्यास दीड महिना उशीर झाला. त्यामुळे, चीनने भारतातून 25 ते 30 हजार टन माल खरेदी केला़  गेल्या वर्षीचा माल जवळपास संपत आल्याने, तसेच थंडीच्या सुरुवातीमुळे भारतातील स्थानिक विक्रीतील वाढ, चीन व कोरिया यांची खरेदी असा दुहेरी योग बाजारात जुळून आला आहे़  

भारतातील तिळाचा दर्जा यंदा चांगला असून आफ्रिकेतील निर्यातदारांनी शीपमेंट न केल्यास भारतात आणखी तेजी येऊ शकते़  सद्य:स्थितीत मार्केटयार्डातील भुसार बाजारात कच्च्या तिळाच्या प्रतिकिलोस 85 ते 100 रुपये दर मिळत आहे. तर, गेल्या वर्षी प्रतिकिलोला 90 ते 100 रुपये दर असलेल्या स्वच्छ तिळाला यंदा 110 ते 120 रुपये इतका भाव मिळत आहे. पुढील महिन्यात आलेल्या संक्रांतीच्या सणासाठी तिळाच्या मागणीत वाढ होऊन दरात वाढ होईल, अशी शक्यताही व्यापारी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे.