Tue, Nov 20, 2018 11:06होमपेज › Pune › जिल्ह्यातील 139 पुलांवर सेन्सर

जिल्ह्यातील 139 पुलांवर सेन्सर

Published On: Jun 22 2018 2:05AM | Last Updated: Jun 22 2018 1:32AMपुणे : दिगंबर दराडे

गतवर्षी मुसळधार पावसात महाडजवळील सावित्रीनदीवरील पूल कोसळून  एस.टी. बस वाहून गेल्याची दुर्घटना घडल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील तब्बल 139 पुलावर सेन्सर बसवले आहेत.  या सेन्सरमुळे नदीवरील पाण्याची पातळी धोकादायक स्तरावर पोहचल्याचा अ‍ॅलर्ट मिळून दुर्घटना रोखण्यास मदत होईल. 

पावसाळ्यात नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्यास सेन्सरव्दारे जिल्हाधिकारी ग्रामसेवक, सरपंचांना मेसेज आणि ई मेलच्या माध्यमातून तत्काळ कळविले जाणार आहे. अनेक पूल नद्यांवर बांधले आहेत. तेथे दरवर्षी पावसाळ्यात पुराचा धोका उद्भवतो. ज्या नद्यांवर शंभर मीटर उंचीचे पूल आहेत. त्या ठिकाणी हे सेन्सर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाच विभाग असून त्यात सार्वजनिक बांधकाम पूर्व दक्षिण, उत्‍तर प्रकल्प आणि सां.बां. विभाग पुणे यांचा समावेश आहे.  या विभागाच्या अखत्यारित 31 ब्रिटिशकालिन पूल येतात. सावित्री दुर्घटनेनंतर हे सर्व पूल वाहतुकीसाठी योग्य आहेत की नाहीत याचे सर्वेक्षण करण्यात आले. आवश्यक त्या ठिकाणी किरकोळ दुरूस्तीसह सेन्सर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती बांधकाम विभागातील सूत्रांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली. 

जिल्ह्यातील 518 पुलांची तपासणी

पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने एकूण 518 पुलांचे सुरक्षा परीक्षण पूर्ण केले आहे. यामध्ये 429 छोटे तर 89 मोठे पूल आहेत. यापैकी 39 मोठे तर 138 लहान पूल हे ब्रिटिशकालीन आहेत. या ब्रिटिशकालीन पुलाचे सुरक्षा परिक्षण करताना विशेष काळजी घेण्यात आली आहे.