Fri, Apr 26, 2019 03:21होमपेज › Pune › धूळदाणीनंतर जगभर पुन्हा अनुकूलता

धूळदाणीनंतर जगभर पुन्हा अनुकूलता

Published On: Feb 18 2018 2:01AM | Last Updated: Feb 18 2018 12:09AMपुणे : नंदकुमार काकिर्डे 

मागील सप्ताहात जोरदार धूळदाण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर शनिवार दि. 17 फेब्रुवारी रोजी संपलेल्या सप्ताहामध्ये जगभरातील शेअर बाजारांवरील वातावरण पुन्हा उसळून चांगले निर्माण झालेले होते.  एका बाजूला डॉलरने जागतिक बाजारात नीचांकी पातळी नोेंदवली असतानाही  व कर्जाच्या किमती वाढत असतानाही पुन्हा एकदा शेअर बाजारांवर अनुकूलतेचे वातावरण निर्माण झालेले पाहावयास मिळाले.

गेल्या सप्ताहात हाँगकाँगच्या बाजारावर सर्वाधिक म्हणजे 5.7 टक्के इतकी निर्देशांकाची वाढ झाली. तसेच अमेरिकेचा निर्देशांकही 5.7 टक्के ऊसळून परत वर आला. त्याखालोखाल ब्राझिल 3.4 टक्के; फ्रान्स 2.9 टक्के; चीन 2.2 टक्के; सिंगापूर 2 टक्के; इंग्लंड 1.9 टक्के; जर्मनी 1.7 टक्के; जपान 1.6 टक्के असे निर्देशांक वर गेलेले होते. केवळ अपवाद भारतीय शेअर बाजाराचा होता. तेथे सप्ताहभरात निर्देशांक वर गेलेला नव्हता. जवळपास त्याच पातळीवर तो राहीला.

नाममात्र वाढ
मुंबई शेअर निर्देशांक कसाबसा 34 हजार अंश पातळीच्या वर राहण्यात यशस्वी झाला. या सप्ताहात तो केवळ पाच अंश वर जाऊन म्हणजे 0.01 टक्के वर जाऊन 34 हजार 10.76 अंश पातळीवर बंद झाला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकही 2.65 अंश खाली घसरुन 10 हजार 452.30 अंश पातळीवर स्थिरावला. मुंबई शेअर बाजारावर मात्र विविध उद्योगांच्या निर्देशांकाची कामगिरी पहाता केवळ धातू उद्योग, तेल व वायू कंपन्या व एफएमसीजी या उद्योगांचे निर्देशांक 0.1 ते 0.2 टक्के इतके वर गेलेले होते. मात्र अन्य निर्देशांक खाली घसरलेले होते. 

स्टेट बँकेची 8.32 टक्के घसरण होऊन तो 271.25 रुपयांवर बंद झाला. यस बँक ही 4.19 टक्के घसरुन 311.90 रुपये पातळीवर स्थिरावला. सन फार्मा 1.28 टक्के खाली गेला व 575,20 रुपये पातळीवर बंद झाला. मात्र इन्फोसिस 1.17 टक्के वर गेला व 1124.85 रुपये पातळीवर स्थिरावला. महिंद्रही 0.93 टक्के खाली गेला व 743 रुपये पातळीवर स्थिरावलेला होता. एकंदरीत खूपच संमिश्र वातावरण सप्ताहभर राहिले. 

गेल्या सप्ताहात केवळ चार सत्रांमध्ये व्यवहार झाले. मंगळवार दि. 13 रोजी महाशिवरात्रीनिमित्त शेअर बाजारास अधिकृत सुटी होती. अन्य सत्रात सरासरी 2900 कंपन्यांमध्ये व्यवहार होत होते. यामध्ये सर्वाधिक चांगली आर्थिक कामगिरी नेसले कंपनीत झाली. त्याचा भाव 6991.20 रुपयांवरून 8.4 टक्के वर जाऊन 7580 रुपयांवर बंद झाला. तसेच हिंदुस्थान झिंक 2882.20 रुपयांवरून 8.3 टक्के वर जाऊन 312.1 रुपयांवर तर रिलायन्स कम्युनिकेशन 26.55 रुपये पातळीवरुन 28.45 रुपयांवर बंद झाला. त्यात 7.2 टक्के भाववाढ झाली. जीएसके कन्झ्युमरही 6215.55 रुपयांवरून 6628 रुपयांवर बंद झाला तर इप्का लॅब्ज 595.45 रुपयांवरून 5.8 टक्के वर जाऊन 630 रुपयांवर स्थिरावला.

गीतांजली जेम्सची घसरण गेल्या सप्ताहात प्रतिकूल 
कामगिरी गीतांजली जेम्समध्ये झाली. त्याचा भाव 56.125 रुपयांवरून 33.1टक्के खाली घसरून 37.55 रुपये झाला. पंजाब नॅशनल बँक 159.3 रुपयांवरून 20.7 टक्के घसरून 126.25 रुपये झाला.