Tue, Mar 19, 2019 09:13होमपेज › Pune › तिनं बोट धरून मोठं केलं; अन् त्यानं...!

तिनं बोट धरून मोठं केलं; अन् त्यानं...!

Published On: Jun 15 2018 1:06AM | Last Updated: Jun 15 2018 12:44AMपुणे : प्रतिनिधी

खडकीमध्ये स्वतःच घर मात्र, मुलांकडून मिळणार्‍या वागणुकीमुळे आजी मोठ्या बहिणी सोबत राहू लागल्या. बहिण गेल्यानंतर त्यांच्या जगण्याचा आधारच गेला. काही दिवसांनंतर त्यांची परिस्थिती पाहून काही तरुणांनी त्यांना निगडीतील वृद्धाश्रमात दाखल केले. ‘मुलांच्या सोबत अवहेलनेचे जीवन जगण्यापेक्षा वृद्धश्रमात राहिलेलं बरं’, असं डोळ्यातून येणारे अश्रू आवरत रमा आजी (नाव बदलले आहे.) बोलत होत्या. जेष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागृती दिनानिमित्त आमचे प्रश्‍न समजून घ्या, असे त्या कळवळून सांगत होत्या.

दुसर्‍या आजी गोरी आजी. यांचे नाव वृद्धाश्रमातच ठेवले गेले. त्यांच्या डोळ्यांनी त्यांची साथ सोडली. अंधत्व आल्याने मुलांनी सांभाळ करण्यास नकार दिला गेला. बेवारस अवस्थेत भोसरी येथील पुलाखाली आढळून आल्याने त्यांना पोलिसांनी वृद्धश्रमात दाखल केले. गोरी आजी हे नाव देखील वृद्धश्रमातच त्यांना मिळाले, गोरी आजी त्यांच्या भूतकाळाबाबत जास्त बोलत नाहीत. त्या म्हणतात, ‘कुणाला दोष देऊन काय फायदा. येथे तयार झालेला परिवारच मला जपतो. माझ्या सारख्या अनेक आज्या येथे रहातात आहेत. सगळ्यांच्या घरची सारखीच परिस्थिती आहे. ‘मुळच्या गोव्याच्या असलेल्या मृदूला आजी, तळेगावात भावासोबत रहात होत्या. भावाचे आकाली निधन झाल्याने, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना सांभाळण्यास असमर्थता दिर्शवली. तळेगावत एका इमारतीच्या टेरेसवर राहणार्‍या मृदूला आजीला आजूबाजूच्या तरूणांनी वृद्धश्रमात दाखल केले. वृद्धाश्रमात दाखल झालेल्यांच्या या कथा आहेतच, पण कुटुंबात राहूनही अनेक वयोवृद्ध आपल्याच मुलांकडून होणारे अपमान सहन करीत जगताहेत. हे कुठेतरी थांबायला हवे.

कमी-अधिक प्रमाणात अनेक वृद्धांच्या समस्या अशाच आहेत. ज्यावेळी मायेची माणसं जवळ असणे आवश्यक वाटते, त्याचवेळी मुले आपल्या वृद्ध आई-वडीलांना दुर करतात. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात याचे प्रमाण जास्त असल्याचे वृद्धांसाठी काम करणार्‍या समाजसेवकांचे म्हणणे आहे.