Thu, Mar 21, 2019 15:27होमपेज › Pune › मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थांची चढ्या दराने विक्री

मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थांची चढ्या दराने विक्री

Published On: Jun 30 2018 1:19AM | Last Updated: Jun 30 2018 12:47AMपिंपरी : प्रतिनिधी

मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विकले जातात; तसेच बाहेरील खाद्यपदार्थ मल्टिप्लेक्समध्ये नेण्यास परवानगी देऊनही मल्टिप्लेक्सवाले त्यावर बंदी घालत आहेत. त्यांच्या निषेधार्थ चिंचवडमधील बिग सिनेमा मल्टिप्लेक्समध्ये मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. बिग सिनेमाच्या  बाहेरील फलक फाडत,  खाद्यपदार्थ विक्री  स्टॉलमधील पॉपकॉन फेकत मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.  बिग सिनेमाच्या व्यवस्थापनाला निवेदनही देण्यात आले.या आंदोलनात राजू साळवे, हेमंत डांगे, अंकुश तापकीर, बाळा दानवले, दत्ता घुले, रूपेश पटेकर, अश्विनी बांगर, सीमा बेलापूरकर, संजय यादव आदी सहभागी झाले होते.

मल्टीप्लेक्स बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी देऊनही त्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार तसेच मल्टीप्लेक्सच्या कारभारावर संताप व्यक्त केला. प्रेक्षकांना बाहेरील खाद्यपदार्थ थिएटरमध्ये नेण्यास बंदी असेल तर मल्टीप्लेक्समधील खाद्यपदार्थांची विक्री का थांबवत नाही, असा सवाल करत खंडपीठाने थिएटर मालक तसेच राज्य सरकारला सुनावले होता. एवढेच नव्हे तर अव्वाच्या सव्वा दराने विकले जाणारे  हे  पदार्थ सामान्य दरात विकले गेले पाहिजेत, असे मतही खंडपीठाने व्यक्त केले आहे.

मल्टीप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विकले जातात. तसेच बाहेरील खाद्यपदार्थ चित्रपटगृहात नेण्यास परवानगी देऊनही त्यास मल्टीप्लेक्स प्रशासनाकडून सुरक्षेचे कारण देत टाळाटाळ करण्यात येते. त्याच्या निषेधार्थ शहरात मनसेने आंदोलन केले. आज आम्ही शहरातील सर्वच चित्रपटगृहात जाऊन खाद्यपदार्थांची जादा दरातील विक्री बंद करण्याबाबत निवेदन दिले आहे. जर या मल्टीप्लेक्स व्यवस्थापनाने त्याची अंमलबजावणी केली नाही, तर येत्या काळात मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेने दिला.