Tue, Apr 23, 2019 18:12होमपेज › Pune › पंतप्रधान आवास घोटाळाप्रकरणी न्यायालयात जाणार

पंतप्रधान आवास घोटाळाप्रकरणी न्यायालयात जाणार

Published On: Jul 25 2018 6:07PM | Last Updated: Jul 25 2018 6:07PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणार्‍या पंतप्रधान आवास योजनेच्या गृहप्रकल्पांमध्ये आर्थिक घोटाळा झाला असून, त्याचे दर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणापेक्षा अधिक आहेत. त्या संदर्भात न्यायालयात दाद मागणार आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी बुधवारी (दि.25) दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी आवास प्रकल्पानेच सत्ताधारी भाजप गैरव्यवहार केला आहे. भाजपचे प्रमुख नेत्यांनी त्यामध्ये हात धुवून घेतले आहेत. त्या गैरव्यहाराची कुणकूण लागल्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वडमुखवाडीतील गृहप्रकल्पाचे भूमिपूजन ऐनवेळी रद्द करण्याची नामुष्की भाजपवर आली, असा आरोप साने यांनी केला. 

भाजपच्या दोन्ही आमदारांमध्ये या प्रकल्पाच्या कामावरून एकमत न झाल्याने बोर्‍हाडेवाडीत प्रकल्प स्थायी समितीने दप्तरी दाखल केला आहे. या प्रकल्पाचे दर प्राधिकरणापेक्षा अधिक आहेत. ही मंडळी गोरगरीबाच्या घरांमध्येही लोणी खाण्याचे काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.राष्ट्रवादी काँग्रेसने जेएनएनयुआरमध्ये अंतर्गत राबविलेल्या घरकुल योजनेत 398 चौरस फूट आकाराच्या सदनिकासाठी 3 लाख 76 रूपयांना उपलब्ध करून दिल्या. केवळ 4 वर्षांत हे दर वाढून तब्बल 10 लाख 42 हजार रूपयपर्यंत पोहचले आहेत. 

त्यातही केवळ 323 चौरस फूट आकाराची सदनिका देण्यात येणार आहे. केवळ ठेकेदारांशी संगनमत करून वाढीव दर निश्‍चित करून सदर काही प्रकल्पांना मागील स्थायी समितीने मंजुरीही दिली आहे. त्यातील काही प्रकल्पांना वर्कऑर्डरही दिली आहे. या सर्व प्रकल्पामध्ये संगनमत करून वाढीव दर दिले गेले असून, त्याविरोधात न्यायालयात दावा दाखल करणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

‘सेल्फी विथ खड्डे’चे 100 रुपये वाटप आजपासून

पावसामुळे शहरातील रस्त्यावर लाखो खड्डे पडले आहेत. पालिका प्रशासनाचा दावा खोटा ठरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ‘सेल्फी विथ खड्डे’ हा उपक्रमाची 18 जुलैला शहरात सुरुवात केली. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, एकूण 350 छायाचित्रे मिळाली आहेत. छायाचित्र पाठविणार्‍यांना गुरुवारपासून (दि.26) 100 रुपयांचे वाटप विरोधी पक्षनेते दालनात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत केले जाणार आहे. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार असून, नागरिकांनी ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर खड्ड्यांचे छायाचित्र पाठविण्याचे आवाहन दत्ता साने यांनी केले आहे.

शहर अभियंत्यास निलंबित करा

शहरात केवळ 2 हजार 369 खड्डे पडले असून, त्यापैकी 85 टक्के खड्डे बुजविल्याचा दावा स्थापत्य विभागाचे शहर अभियंता अंबादास चव्हाण यांनी केला होता. ही आकडेवारी धादांत खोटी असून, आयुक्तांच्या निवासस्थानासमोरच 20 ते 25 खड्डे पडले आहेत. आयुक्तांचे अधिकार्‍यांवर नियंत्रण नसल्याने ते खोटी माहिती देऊन नागरिकांसह पदाधिकार्‍यांची फसवणूक करीत आहेत. त्यामुळे अंबादास चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी साने यांनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे केली आहे.