होमपेज › Pune › सदस्य निवडीत नियम धाब्यावर

सदस्य निवडीत नियम धाब्यावर

Published On: Apr 27 2018 1:08AM | Last Updated: Apr 26 2018 11:42PMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रीय कार्यालय स्वीकृत सदस्यांच्या निवडीत भाजपने यापूर्वी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्याच पावलावर पाऊल टाकून नियम पायदळी तुडवले आहेत. स्वीकृत सदस्यपदी नियुक्त होणारा प्रतिनिधी राजकीय पक्षाचा नसावा हा नियम धाब्यावर बसवत भाजपने स्वीकृत सदस्यपदी आपल्याच कार्यकर्त्यांची वर्णी लावली आहे. स्वयंसेवी संस्थेचा सदस्य असल्याचे औपचारिक ‘रेकॉर्ड’ हाच त्यासाठी आधार घेतला गेला आहे.

महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालय स्वीकृत सदस्य पदासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले गेले होते. वैध-अवैध अर्जांची यादी अवैधतेच्या कारणांसह 13 एप्रिल रोजी क्षेत्रीय कार्यालयांच्या सूचना फलकांवर प्रसिद्ध झाली. 160 अर्ज दाखल झाले. त्यापैकी 121 अर्ज वैध तर 39 अर्ज अवैध ठरविण्यात आले. 

अर्ज अवैधतेबाबत  आक्षेप , आक्षेप अर्जावर निर्णय  यानंतर वैध ठरलेले अर्ज प्रभाग समित्यांच्या विशेष सभेत आज ठेवले गेले. महापालिकेच्या आठ प्रभाग समितींवर प्रत्येकी तीन अशा 24 जणांची नियुक्ती झाली; मात्र निवड करताना नियम पायदळी तुडवले गेले आहेत. त्यासाठी पळवाटा शोधण्यात आल्या.

महापालिका अधिनियमातील तरतुदी अंर्तगत प्रभाग समितीमध्ये बिनसरकारी आणि सामाजिक संघटनांचे म्हणजेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी नियुक्त करण्याची तरतूद आहे.  स्वीकृत सदस्यपदी नियुक्त होणारा प्रतिनिधी कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी नसावा. तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारचा कर्मचारी नसावा, अशी अट या सदस्यांना आहे. संबंधित प्रभागातील तो मतदार असावा. संस्थेचा सभासद त्याच्या संस्थेमार्फत प्रभाग समित्यांमध्ये सदस्य पदासाठी संबंधित प्रभाग अधिकार्‍याकडे अर्ज सादर करेल.

 प्रभाग अधिकारी सर्व अर्जांची छाननी करून सर्व अर्ज त्यांच्या पात्रतेबाबत आपल्या अभिप्रायासह प्रभाग समित्यांमध्ये निर्वाचित नगरसेवकांपुढे ठेवतील, अशी तरतूद आहे  मात्र, निवडणूक जाहीर होताच विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींपेक्षा भाजप कार्यकर्त्यांनी आपली वर्णी लागावी, यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसला आहे.  पालिकेच्या  आठही प्रभाग समितीवर सत्ताधारी भाजपचे चेहरे निवडून आले आहेत. एका प्रभाग समितीवर तीन याप्रमाणे एकूण 24 जण जणू भाजपचेच प्रतिनिधित्व करणार आहेत.

‘अ’  क्षेत्रीय कार्यालयावर राजेश  सावंत, सुनील कदम, राजेंद्र कांबळे, ‘ब’ वर बिभीषण चौधरी, विठ्ठल भोईर, देवीदास पाटील, ‘क’ वर  सागर हिंगणे, वैशाली खाडे, गोपीकृष्ण धावडे, ‘ड’ वर चंद्रकांत भूमकर, संदीप नखाते, महेश जगताप, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयावर  अजित बुर्डे, साधना तापकीर, विजय लांडे, ‘फ’ वर दिनेश यादव, संतोष भाऊसाहेब मोरे, पांडुरंग गुलाब भालेकर, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयावर संदीप गाडे, विनोद तापकीर, गोपाळ मळेकर, ‘ह’ वर अनिकेत काटे, कुणाल लांडगे, संजय कणसे या भाजपचा चेहरा  असलेल्या कार्यकर्त्यांची नियुक्ती झाली आहे.

मिनी महापालिका असा दर्जा मिळालेल्या प्रभाग समित्यांना महापालिका राजकारणात महत्त्वपूर्ण स्थान आहे. या प्रभाग समित्यांमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होत असल्याने तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांना याठिकाणी न्याय देणे शक्य असल्याने राजकीयदृष्ट्याही त्यांचे महत्त्व वाढले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये  झाली. या निवडणुकीत सत्तेवर आलेल्या भाजपने तब्बल वर्षभरानंतर  स्वीकृत सदस्य निवडणूक घेतली ; परंतु या निवडणुकीत नियम पायदळी तुडवत आपल्याच कार्यकर्त्यांची वर्णी लावल्याने विविध संस्थांच्या खर्‍या प्रतिनिधींची अवस्था ‘हेचि फळ काय मम तपाला’ अशी झाली आहे.