Mon, Jan 21, 2019 15:09होमपेज › Pune › दृष्टिहीन सीमाला ९० टक्के गुण

दृष्टिहीन सीमाला ९० टक्के गुण

Published On: Jun 09 2018 1:36AM | Last Updated: Jun 09 2018 12:43AMपिंपरी : प्रतिनिधी 

आळंदी येथील संत ज्ञानेश्‍वर या अंध शाळेतील सीमा खराद या विद्यार्थिनीने दृष्टिहीनतेवर मात करून दहावीच्या परीक्षेत 90.00 टक्के गुण मिळविले आहेत. परंतु दृष्टिहीन विद्यार्थ्यांना शासनाकडून स्वत: ब्रेललिपीमध्ये पेपर लिहिण्याची सुविधा मिळाल्यास दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या गुणात आणखी भर पडली असती, अशी व्यथा सीमाने बोलून दाखविली. 

परीक्षेच्या वेळी आम्हाला अजूनही रायटर देण्यात येतात. स्वत:मध्ये लिहिण्याची जिद्द असूनही ती सुविधा मिळाली नाही. आपण जितके मन लावून स्वत:चा पेपर लिहितो, तसा एखादा रायटर लिहिलच असे नाही;  तसेच विज्ञान आणि भूगोल विषयांच्या पेपरमध्ये आकृती काढाव्या लागतात, ते दृष्टिहीनांना जमत नसल्याने, त्यांना त्याची थेअरी लिहावी लागते. परिणामी आकृतीचे मार्कस मिळतात ते आम्हाला मिळतीलच असे नाही, असे ती म्हणाली. 

विद्यार्थ्यांना येणार्‍या आर्थिक अडचणी, ब्रेल लिपीतील उपलब्ध न होणारे अभ्यासाचे साहित्य या सगळ्याचा परिणाम म्हणजे त्यांचे उच्च शिक्षण रखडते.  

आयएस अधिकारी व्हायचे आहे 

सीमाला भविष्यात आयएस अधिकारी बनायचे आहे. दृष्टीहिन विद्यार्थी हा स्वत:कडे क्षमता असूनही केवळ पर्याय उपलब्ध नसल्याने दुसर्‍यावर अवलंबून राहतो. ही बाब तिला खटकते. त्यामुळे स्वतः आयएएस अधिकारी होन्याचे स्वप्न तिने बाळगले आहे.