Wed, Jun 26, 2019 18:13होमपेज › Pune › पक्ष-व्यक्ती न पाहता शहराचे हित पाहा

पक्ष-व्यक्ती न पाहता शहराचे हित पाहा

Published On: Jun 22 2018 2:05AM | Last Updated: Jun 22 2018 1:30AMपुणे : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून रयतेसाठी काम केले, त्याप्रमाणे राजकीय पक्ष आणि व्यक्तींकडे न पाहता शहर आणि देशाचे हित पहा, शहरातील प्रत्येक नागरिकांसाठी काम करा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेतील नगरसेवकांना दिला. महापालिकेच्या विस्तारित इमारतीच्या आणि या इमारतीमधील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाचे उद्घाटन गुरुवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. 

ते म्हणाले, पुणे महापालिकेने सुंदर आणि देखणे सभागृह बांधले आहे. या सभागृहाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिल्याने सभागृहाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार चालवताना नेहमीच रयतेचा विचार केला. सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नावाच्या सभागृहात काम करत असताना त्यांचे विचार व आचार अंमलात आणून काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी पक्ष आणि व्यक्ती न पाहता शहर, शहरातील प्रत्येक नागरिक आणि देशाचे हित पाहणे गरजेचे आहे. 

पुणे या ऐतिहासिक शहराला शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला आहे. त्यांच्या कार्याने ही भूमी पावन झालेली आहे. देशाच्या सांस्कृतिक राजधानीसोबत या शहराने ज्ञाननगरी म्हणून नावलौकिक मिळविलेला आहे. 21 व्या शतकात मुंबईनंतर पुणे हे विकासाचे इंजिन म्हणून काम करणार आहे. पुणे हे आंतरराष्ट्रीय शहर व्हावे, यासाठी विविध विकासाची कामे राबविली जात आहोत. पुणे महामेट्रो, रिंगरोड हे विकासाचे मॉडेल ठरणार आहे. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ घातले असून शहरातून वाहणार्‍या मुळा व मुठा नदीचे पुनर्जीवन करण्याचे काम हाती घेतले आहे. याशिवाय स्वारगेट येथे ट्रान्सपोर्ट हब होत आहे. हे शहर आदर्श, सुंदर व देखणे करण्यासाठी राज्य शासनाचे पाठबळ कमी पडू दिले जाणार नाही, असेही आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. 

जावडेकर म्हणाले, अनेक राज्यांच्या विधान सभांपेक्षा जास्त देखणे हे पालिकेचे सभागृह झाले आहे. हे सभागृह जेव्हढे देखणे आहे, तेव्हढेच देखणे काम करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. विकासाच्या कामावर राजकारण न करता विकासासाठी स्पर्धा केली पाहिजे. पालकमंत्री बापट म्हणाले, पुण्याचा डीपी मंजूर झाल्याने विकासाच्या वाटा मोकळ्या झाल्या आहेत. शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रस्ताविक करताना महापौर टिळक यांनी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर नावलौकिक मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला.