Sat, Apr 20, 2019 17:51होमपेज › Pune › राहण्यायोग्य शहर सर्वेक्षणातील पिछाडीच्या कारणांचा  शोध सुरू

राहण्यायोग्य शहर सर्वेक्षणातील पिछाडीच्या कारणांचा  शोध सुरू

Published On: Aug 22 2018 1:23AM | Last Updated: Aug 22 2018 1:01AMपिंपरी : प्रतिनिधी

राहण्यायोग्य शहराच्या सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचा क्रमांक तब्बल 69 व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. मात्र, शेजारच्या पुणे शहराने या सर्वेक्षणात क्रमांक एकचे स्थान मिळविले आहे. शहर पिछाडीवर पडण्यामागच्या कारणांचा शोध घेतला जात आहे, असा खुलासा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी (दि.21) केला. 

पुण्याला लागून असलेले पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीचा क्रमांक पिछाडीवर गेल्याबाबत  विचारले असता ते बोलत होते. आयुक्त हर्डीकर म्हणाले की, पालिकेकडून दिलेल्या माहितीचा आणि नामांकन पद्धतीचा आढावा घेण्यात येत आहे. त्या माहितीचा सविस्तर अभ्यास करून अवलोकन करण्यात येईल. त्यानुसार शहर राहण्यायोग्य करण्यासाठी विविध उपाययोजना व योजना हाती घेण्यात येतील. 

या सर्वेक्षणात ‘कंमाड अ‍ॅण्ड कंट्रोल रूम’ (नियंत्रण कक्ष) या विभागास अधिक महत्त्व दिले गेले आहे. त्यात आपले शहर मागे पडले. स्मार्ट सिटीमध्ये ‘कंमाड अ‍ॅण्ड कंट्रोल रूम’ पालिका विकसित करीत आहे. विमानतळ, सार्वजनिक जागा व सुविधा, ऐतिहासिकस्थळे, पर्यटनस्थळे आणि त्या संदर्भातील सुविधा याबाबत काम करणार्‍या स्वयंसेवी संस्था या विभागात शहर मागे पडले आहे. त्यासंदर्भात शहरात काम करण्याची गरज आहे. 

आयुक्त म्हणाले की, शहराला सन 2030 पर्यंत नवी स्वतंत्र ओळख मिळवून देण्यासाठी सिटी ट्रान्सफॉर्मेशन ऑफिसची (सीटीओ-शहर परिवर्तन कार्यालय) पालिकेने स्थापना केली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील राहण्यायोग्य शहराची तुलना करून प्रामुख्याने 6 घटकांवर लक्ष केंद्रित केले आहे. चिरंतन वाहतूक सुविधा व व्यवस्था, पर्यावरण व राहण्यायोग्य शहर, पर्यटन व सांस्कृतिक, प्रशासन व कायदा, माहिती व तंत्रज्ञान, शहराचा आर्थिक विकास अशी विभागणी केली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांच्या मतांनुसार हे नियोजन केले जात आहे.  शहराचा इतर शहरांशी तुलनात्मक अभ्यास करण्यात येत आहे. तसेच विविध शहरात असणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण बाबी आपल्या शहरात राबवण्यात याव्यात व नागरिकांचे जीवनमान उंचवावे असा प्रयत्न करण्यात येणार आहे. दीर्घकालीन आणि अल्पकालीन ‘व्हीजन’ ठरविण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. 

‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’चा उपक्रम आठवड्याभरात सुरू करणार पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या वतीने पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव परिसरातील वेगवेगळ्या 4 सायकल कंपन्यांमार्फत तब्बल 45 ठिकाणी ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा उपक्रम आठवड्याभरात सुरू केला जाईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. तसेच, पादचार्‍यांसाठी विशेष मार्ग विकसित केले जात असून, त्यासंदर्भात नुकताच आकुर्डीत नागरी संवाद घेण्यात आला. दुसरा नागरी संवाद पिंपळे सौदागर येथे घेण्यात येणार आहे.

देशातील 111 मेट्रो सिटींचे सर्वेक्षण

केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाकडून हे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यासाठी देशातील 111 मेट्रो सिटींची निवड करण्यात आली होती. राहण्यायोग्य शहराची निवड करताना प्रामुख्याने प्रशासन, सामाजिक संस्था, आर्थिक आणि भौतिक पायाभूत सुविधा हे 4 निकष विचारात घेण्यात आले होते. त्यानुसार मंत्रालयाने 13 ऑगस्टला जाहीर केलेल्या ‘इज ऑफ लिव्हिंग इन्डेक्स’मध्ये पुण्याला अव्वल स्थान मिळाले आहे. पिंपरी-चिंचवड शहर 69 व्या स्थानी फेकले गेले आहे.