होमपेज › Pune › कंपनीत भीषण आग; आगीतच झाले ३ स्फोट

कंपनीत भीषण आग; आगीतच झाले ३ स्फोट

Published On: May 06 2018 5:58PM | Last Updated: May 06 2018 5:58PMयवत ( पुणे ) : वार्ताहार

भांडगाव (ता दौंड ) येथील  भांडगाव - खोर मार्गावर असलेल्या मिनाक्षी फायरी इनगार्ड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आज (६मे ) रोजी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान स्क्रॅप लोखंड असलेल्या साठ्याला आग लागली. या आगीदरम्यान दोन ते तीन स्फोट झाले. यावेळी जिवीतहानी झाली नसली तरी दोन ते तीन परप्रांतीय कामगार जखमी झाले.

या स्फोटाचा आवाज एक किलोमीटर अंतरापर्यंत गेल्याचा स्थानिक रहिवाशांनी सांगितले. यापूर्वीही या कंपनीमध्ये (३१जानेवारी) रोजी भीषण स्फोट होऊन ३ परप्रांतीय कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला होता तर ७ परप्रांतीय कामगार गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर औद्योगिक सुरक्षा विभागाने कंपनीच्या मालकावर व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करीत कंपनी बंद करण्याचे आदेश दिले होते. परंतु कंपनी प्रशासनाने हे आदेश झुगारत पुन्हा मीनाक्षी कंपनी सुरू केली. तीन महिन्यांपूर्वीची घटना ताजी असतानाच आजच्या या घटनेने मीनाक्षी कंपनीतील परप्रांतीय कामगारांचा व गावालगत असलेल्या कंपनीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या कंपनीमध्ये स्क्रॅप लोखंड वितळवून त्यापासून लोखंडी एँगल तयार करण्यात येतात. येथे अनेक वेळा छोट्या - मोठ्या घटना घडल्या आहेत. भट्टीत वितळवलेला तप्त गरम रस स्क्रॅप लोखंडावर पडल्यामुळे ही आग लागली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लागलेली आग स्थानिक टँकरच्या साहाय्याने पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. ही कंपनी भांडगाव लगत असून या कंपनी शेजारून भांडगाव - खोर हा राज्यमार्ग जात आहे. या कंपनीच्या धुरामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून याचा त्रास भांडगाव ग्रामस्थांना व येथून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.

कंपनीविषयी स्थानिक ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अनेक वेळा तक्रारी करून देखील याची दखल घेतली गेली नाही. औद्योगिक सुरक्षा विभागाने कंपनी विरोधात खटला दाखल करून कंपनी बंद करण्याचे आदेश देऊनही मुजोर कंपनी मालक व प्रशासन त्याला दाद न देता कंपनी सुरूच ठेवल्याने कंपनीतील परप्रांतीय कामगारांचा व येथील ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान भांडगाव ग्रामपंचायत प्रशासनाने गेल्याच आठवड्यात कंपनीला लेखी पत्रव्यवहार करून कंपनी सुरू केल्याबाबत खुलासा मागविला असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

व्यवस्थापन झालेय मग्रूर 

रविवारी कंपनीत स्फोट झाल्यानंतर माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता या ठिकाणी असणाऱ्या सुरक्षा रक्षक व व्यवस्थापनाने मग्रूरपणे वागत माहिती देण्याच टाळले त्यामुळे यांना नक्की पाठबळ कोणाचा असा प्रश्न उपस्थित होत आहे