Wed, Jul 17, 2019 10:35होमपेज › Pune › राज्यातील शाळा होणार ‘डिजिटल’

राज्यातील शाळा होणार ‘डिजिटल’

Published On: Jan 19 2018 1:55AM | Last Updated: Jan 18 2018 11:57PMपुणे : प्रतिनिधी 

‘रोटरी’तर्फे  साक्षरता विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यासाठी ‘रोटरी इंडिया लिटरसी मिशन’ (आरआयएलएम) या स्वतंत्र संस्थेची स्थापना करण्यात आली असून ‘डिजिटल शाळा’ हा उपक्रम राबवण्यासाठी ही संस्था काम करीत आहे. त्यानुसार ‘ई-शिक्षा’ हा विशेष प्रकल्प राबवण्यासाठी ‘आरआयएलएम’तर्फे  महाराष्ट्र सरकारबरोबर सामंजस्य करार करण्यात येत आहे. याअंतर्गत ई-लर्निंगच्या विविध सुविधा देऊन राज्यातील अठरा हजार शाळा डिजिटल करण्यात येणार आहेत.

‘रोटरीतर्फे  19 जानेवारी (आज) कर्वेनगर येथील डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे या प्रकल्पाचा औपचारिक उद्घाटन समांरभ होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे मुख्य सचिव नंदकुमार, ‘आरआयएलएम’चे अध्यक्ष रो. शेखर मेहता, ‘रोटरी इंटरनॅशनल’चे माजी अध्यक्ष कल्याण बॅनर्जी यांची देखील या वेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या प्रकल्पाबाबत माहिती देताना अभय गाडगीळ म्हणाले, रोटरीसाठी साक्षरता हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. भारताला 100 टक्के साक्षर बनवण्यासह शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी रोटरी सातत्याने कार्यरत आहे. पुणे शहराला पूर्वेचे ऑक्सफर्ड तसेच विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. त्यामुळेच या प्रकल्पाच्या उद्घाटनाची संधी आम्हाला मिळाली असून, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील रोटरींतर्फे  हा मान या शहराला देण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ई-शिक्षा हा खूप महत्वाचा विषय असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याची अंमलबजावणी होणे महत्वाचे आहे, हे विचारात घेऊन ‘आरआयएलएम’ने ‘टीच’ अर्थात ‘टी-ई-ए-सी-एच’ अशा नावाने या प्रकल्पाची आखणी केली आहे. टी- अर्थात टीचर सपोर्ट याप्रमाणेच ई- ईलर्निंग, ए- अ‍ॅडल्ट लिटरसी, सी- चाईल्ड डेव्हेलपमेंट आणि एच- हॅपी स्कूल असा त्याचा अर्थ आहे.

या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र आणि विविध राज्ये, विविध कंपन्या, विशिष्ट स्वयंसेवी संस्था तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांबरोबर देशपातळीवर काम करण्याचा ‘आरआयएलएम’चा प्रयत्न आहे. शाळांना डिजिटल करण्याबरोबरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारणे, अध्यापनाचा दर्जा उच्च बनविणे तसेच सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना ई-लर्निंग आणि माहिती तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी संस्थेतर्फे मदत करण्यात येणार असल्याचे देखील गाडगीळ यांनी सांगितले.