Sun, Jul 21, 2019 10:10होमपेज › Pune › हजारो कृषी पदवीधारकांवर टांगती तलवार

हजारो कृषी पदवीधारकांवर टांगती तलवार

Published On: Apr 07 2018 1:38AM | Last Updated: Apr 07 2018 1:38AMपुणे : प्रतिनिधी

कृषी क्षेत्राचे शिक्षण घेत असलेले विद्यालय तसेच विद्यापीठ अनधिकृत ठरल्याने राज्यातील हजारो कृषी पदवी आणि पदविकाधारक शासकीय स्तरावरील भरतीस अपात्र ठरणार असून कृषी क्षेत्रातील पुढील संधीनाही मुकणार आहेत. या विद्यालयांमधून पदविका अभ्यासक्रमाची पहिलीच तुकडी बाहेर पडल्याने यावर्षी विविध अभ्यासक्रम तसेच शासकीय व खासगी नोकर्‍यांमध्ये हे विद्यार्थी अर्ज करण्याची शक्यता आहे. मात्र, ही विद्यालये तसेच विद्यापीठ अनधिकृत असल्याने या विद्यार्थ्यांची पदविका व पदवी ग्राह्य धरली जाणार नसल्याचे परिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, विद्यालयांची नोंदणी नसल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासूनही वंचित राहावे लागल्याचे चित्र दिसून येत आहे. 

गेल्या दोन वर्षापासून राज्यात मागासवर्गीय खुले कृषी विद्यालय, सिध्देश्‍वर प्रसाद बहुउद्देशीय सेवा संस्था, राष्ट्रीय मागासवर्गीय खुले कृषी महाविद्यालय माहिती व तंत्रज्ञान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रयत वतन रेजिमेंट, मुक्ताई बहुउद्देशीय संस्था, मागासवर्गीय व खुले कृषी महाविद्यालय, छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, राष्ट्रीय कृषी विद्यालय माहिती व तंत्रज्ञान या नावाने 62 बोगस कृषी विद्यालये कार्यरत आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, माढा, बार्शी, करमाळा, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट, कोन्हाळी, तेरामैल, बरूर, करकंब, महूद, सासुर्डे, माळशिरज, अहमदनगर जिल्ह्यात विजापूर रोड, जामखेड, वाघोली, वाळुंद, पाथर्डी, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव जुन्नर तालुक्यातील आर्वी, जळगाव जिल्ह्यातील नेरीवडगाव, धुळे, कोल्हापूर जिल्ह्यातील अडकूर, कोडोली, सांगली जिल्ह्यातील शिरसगाव, दिघंची गावांमध्ये ही विद्यालये सुरू आहेत. 

याखेरीज, नाशिक जिल्ह्यातील हिरापूर, बुलडाणा जिल्ह्यातील येळगाव, उस्मानाबाद जिल्ह्यातील शिंगोली, खेड, उमरगा, रूई, नळदुर्ग, तुळजापूर, बीड जिल्ह्यातील धारूर, कासार मुर्शदपूर, चिखली, बीड, शिरूर, मोरगाव, पेठसांगवी, युसुफवडगाव, लातूर जिल्ह्यातील तपसे चिंचाली, शिरूर अनंतपाळ, पेठ, करडखेल, चाकूर, किनगाव, निवाडा, औरंगाबाद जिल्ह्यातील हत्तनूर व ठाणे जिल्ह्यातील किनवली गावांमध्ये ही विद्यालये अनधिकृतपणे राजरोस सुरू असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, अक्कलकोट येथील तडवल रोड परिसरात राष्ट्रीय मागासवर्गीय कृषी विद्यापीठ नावाने विद्यापीठ अनधिकृतरित्या सुरू आहे. हे विद्यापीठ मागील दोन वर्षापासून सुरू असून संलग्न विद्यालयांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या विद्यार्थ्याचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. 

याबाबत बोलताना महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे (शिक्षण) संचालक डॉ. हरिहर कौसडीकर म्हणाले, राज्यातील कृषी विद्यापीठातील अधिष्ठातांना या बोगस महाविद्यालयावर कारवाई करण्यासंदर्भात पत्र पाठविण्यात आले आहे. 

याबाबतचा अहवाल लवकरच कृषी परिषदेकडे प्राप्त होईल. सध्या राज्यातील या सर्व बोगस विद्यालयांची यादी कृषी परिषदेच्या संकेतस्थळावर टाकण्यात आली आहे. यादीमध्ये समाविष्ट असलेल्या संस्थेत शिकणार्‍या सर्व विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घेऊनच प्रवेश घ्यावा तसेच घेतलेला प्रवेश रद्द करावा. कारण, या संस्थांमधून शैक्षणिक अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यानंतर मिळणारे प्रमाणपत्र शासकीय नोकरी तसेच इतर कोणत्याही कामासाठी ग्राह्य धरण्यात येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Tags : pune, pune news, Agriculture University, Unauthorized,