Sun, May 26, 2019 18:56होमपेज › Pune › अनुसूचित जाती, जमातीच्या उद्योजकांसाठी बुधवारी परिषद

अनुसूचित जाती, जमातीच्या उद्योजकांसाठी बुधवारी परिषद

Published On: Dec 30 2017 1:31AM | Last Updated: Dec 29 2017 11:55PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

अनुसूचित जाती जमातीच्या उद्योजकांची क्षमता उंचावण्यासाठी तसेच त्यांच्यातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय (एनएसआयसी) आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीचे (डिक्की) यांच्या संयुक्त विद्यमाने 3 जानेवारी रोजी एकदिवसीय परिषदेचे आयोजन केले आहे. 

अल्पबचत सांस्कृतिक भवन येथे होणार्‍या परिषदेचे उद्घाटन सकाळी 9.30 वाजता उद्योग आणि खाणकाम मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक पी. कृष्ण मोहन यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीचे (डिक्की) अध्यक्ष मिलिंद कांबळे, डिक्कीचे पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष देवानंद लोंढे आणि स्नेहल लोंढे आदी उपस्थित होते. 

यावेळी माहिती देताना कांबळे म्हणाले, भारतभर तब्बल 24 ठिकाणी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार 3 जानेवारी तारीख निवडण्यात आली आहे. 

या परिषदेत 4 परिसंवाद होणार असून बँकींग क्षेत्रातील (स्टँड अप योजना, मुद्रा बँक योजना, इच ब्रॅन्च इन इंडिया) योजनांवर उद्योग जगतातील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. दुसर्‍या परिसंवादात आयआयटी, मराठा चेंबर्स ऑफ इंडिया सारख्या विविध संस्थांच्या व्यक्तींचे चर्चासत्र, तिसर्‍या चर्चासत्रात जीईएम (गव्हर्मेंट ई मार्केट) या नवीन प्रणालीचे फायदे आणि सभासदांची नोंदणी तर चौथ्या सत्रात सुक्ष्म, लघू, मध्यम आणि इतर उद्योजकांना चालना मिळण्यासाठी मार्गदर्शन आणि नव्याने उद्योगजगतात प्रवेश करणार्‍यांची नोंदणी करण्यात येणार आहे.