होमपेज › Pune › सावित्रीच्या लेकींचा टक्‍का

सावित्रीच्या लेकींचा टक्‍का

Published On: May 11 2018 1:12AM | Last Updated: May 10 2018 11:04PMपुणे : गणेश खळदकर

महत्त्वाच्या अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थांमधील लिंगभेद दूर करण्यासाठी सर्व आयआयटी संस्थांमध्ये विद्यार्थिनींसाठी 14 टक्‍के जागा आरक्षित ठेवण्याचे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत आयआयटी संस्थांमध्ये विद्यार्थिनींची 8 टक्केअसणारी संख्या वाढणार असून, 15 हजार रँक असणार्‍या विद्यार्थिनीला देखील आता आयआयटीमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याची माहिती जेईई तज्ज्ञांनी दिली आहे. गेल्या वर्षी 2017 मध्ये 10 हजार 587 जागांवर अ‍ॅडमिशन दिले गेले. त्यामध्ये केवळ 1 हजार 6 एवढ्याच विद्यार्थिनी होत्या. त्यामुळे ही टक्‍केवारी वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या जागा कमी न करता 779 जागा वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता सर्वच आयआयटीमध्ये विद्यार्थिनींचा दबदबा वाढणार आहे.

जेईई तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 हजार रँकच्या विद्यार्थिनीने त्यांच्या प्रवर्गामध्ये टॉप केले, तर त्या विद्यार्थिनीला सर्वसाधारण रँकमध्ये टेक्सटाईल, तर विद्यार्थिनी आरक्षणानुसार मुंबई आयआयटीमध्ये इलेक्ट्रिकलची शाखा मिळू शकते. गेल्या वर्षी 9 हजार रँकवरच सीट ‘अ‍ॅलॉटमेंट’ थांबली होती. परंतु, आता विद्यार्थिनींच्या आरक्षणामुळे जागा वाढल्यामुळे 6 हजार रँकच्या विद्यार्थिनींना प्रमुख शाखा, तर 15 हजार रँकपर्यंतच्या विद्यार्थिनींना ‘ऑफ बीट’ शाखा मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. आयआयटीच्या माध्यमातून केलेल्या एका सर्वेक्षणानुसार आयआयटीमध्ये प्रवेश घेणार्‍या पाच विद्यार्थ्यांमध्ये केवळ एका विद्यार्थिनीचा समावेश असतो.

येत्या 20 मे रोजी जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी देशातून 2 लाख 31 हजार 24 परीक्षार्थी पात्र ठरले आहेत. यामध्ये मुलांची संख्या 1 लाख 80 हजार 331, तर मुलींची संख्या 50 हजार 693 आहे. तर, पुण्यातून साधारण 1200 विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी उत्तीर्ण ठरण्यासाठी खुल्या वर्गासाठी 360 पैकी 74 गुणांचा ‘कटऑफ’ यावर्षी ठरविण्यात आला आहे, तर ओबीसी-एनसीएल वर्गासाठी तो 45 गुणांचा आणि एससी, एसटी वर्गासाठी 24 गुणांचा ठेवण्यात आला. जेईई मेन्स 2018 च्या गुण-स्थानाच्या आधारावर, ऑल इंडिया रँकच्या पहिल्या 100 मध्ये येण्यासाठी विद्यार्थ्यांना 300हून अधिक गुण, तर पहिल्या 1000 मध्ये येण्यासाठी 260हून अधिक गुण आणि 10 हजारमध्ये येण्यासाठी 175हून अधिक गुणांची आवश्यकता असणार आहे. परीक्षेचा निकाल 10 जून रोजी जाहीर होणार आहे. दरम्यान, 2016 मध्ये आयआयटीच्या 10 हजार 500 जागा होत्या, त्यातील केवळ 830 जागांवर विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला.

परंतु, जेईई पात्र विद्यार्थिनींची संख्या मात्र 2 हजार 200 होती. आयआयटी दिल्लीच्या सर्व्हेनुसार प्रत्येक सेमिस्टरमध्ये विद्यार्थिनी विद्यार्थ्यांपेक्षा एका ग्रेडने पुढेच असतात; मात्र जेईई रँकमध्ये मात्र विद्यार्थ्यांच्या पाठीमागे असतात. सध्या विविध आयआयटीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थिनींची संख्या केवळ आठ टक्के आहे, तर परदेशात मात्र हेच प्रमाण जवळपास 49.5 टक्के असल्याचे दिसून येते. त्यामुळे आयआयटीमध्ये विद्यार्थिनींची संख्या वाढविण्यासाठी विद्यार्थिनींना 14 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. जे 2019 मध्ये 17 टक्के आणि 2020 मध्ये ते 20 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला  आहे.