Tue, Jul 23, 2019 10:53होमपेज › Pune › ऐतिहासिक भुयार व संग्रहालय राहणार खुले

ऐतिहासिक भुयार व संग्रहालय राहणार खुले

Published On: Feb 27 2018 1:57AM | Last Updated: Feb 27 2018 1:27AMपुणे : प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत उघडणारा 300 फूट लांबीचा भुयारी मार्ग, नव्याने उभारण्यात आलेले संग्रहालय, सुमारे दीडशे वर्षे जुनी इमारत, इमारतीची भव्य दालने तसेच त्यातील कलाकुसर असे नयनरम्य दृश्य अनुभविण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. विद्यापीठात उद्या बुधवारी (28 फेब्रुवारी) विज्ञान दिनानिमित्त  ऐतिहासिक भुयार व मध्यवर्ती संग्रहालय नागरिकांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. या गोष्टी पाहण्यासाठी नागरिकांसाठी विद्यापीठात हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. 

विद्यापीठाच्या आवारात वारसा दर्शन (हेरिटेज वॉक) या उपक्रमांतर्गत विद्यापीठातील 250 ते 300 फूट लांबीचे ऐतिहासिक भुयार खुले करण्यात येणार आहे. वारसा दर्शन कार्यक्रमाच्या अंतर्गत या दोन्ही गोष्टी तसेच, विद्यापीठातील ऐतिहासिक वास्तू, तिचा इतिहास व विविध वैशिष्ट्ये या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
या हेरिटेज वॉक अंतर्गत इमारतीत जाणारा भुयारी मार्ग, मुख्य इमारत, इमारतीचे मूळ बांधकाम, त्यात झालेले बदल, 100 फूट उंचीचा मनोरा, इमारतीत बांधकामाच्या विविध शैलींचा झालेला संगम, ज्ञानेश्वर हॉल (पूर्वीची बॉल रूम), शिवाजी हॉल (पूर्वीचा डायनिंग हॉल), सरस्वती हॉल तसेच सज्जा, गॅलरी, त्यातील कलाकुसर, बांधकामाची शैली पाहता येणार आहेत.

तसेच मध्यवर्ती संग्रहालयातील भूशास्त्र, मानवशास्त्र आणि इतिहास संबंधित वस्तू, काळा दगड (बेसॉल्ट) पाषाणात आढळणारी आकर्षक खनिजे, माणसाच्या उत्क्रांतीच्या काळात विकसित होत गेलेल्या कवट्या, विविध कालखंडातील दगडी हत्यारे, आदिवासींच्या वापरात असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तू तसेच, ऐतिहासिक काळातील शस्त्रे, शेकडो वर्षांपूर्वी (विविध राजवटीत) वापरात असलेली नाणी नागरिकांना पाहता येणार आहेत. विज्ञान दिनानिमित्त (28 फेब्रुवारी ) विद्यापीठाच्या आवारात मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक व नागरिक येत असतात. त्यामुळे नागरिकांना हा वारसा पाहता यावा, यासाठी भुयार व संग्रहालय खुले ठेवण्यात येणार असून, सकाळी 11 ते सायंकाळी 5.30 या वेळात हे पाहता येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.